थितबीमध्ये लवकरच अॅडव्हेंचर गेमचा थरार; पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 01:13 AM2020-10-13T01:13:06+5:302020-10-13T01:13:20+5:30
दिवाळीनंतर पर्यटन केंद्राला मिळणार चालना
पंकज पाटील
मुरबाड : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ‘थितबी’ या वन पर्यटन केंद्रात आता दिवाळीनंतर पुन्हा जोमाने सुरुवात होणार आहे. वन पर्यटनासोबत अॅडव्हेंचर गेमही सुरू करण्यात येणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.
पर्यटकांना याठिकाणी रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, रिव्हर काँसिंग, कंमाडो ब्रिज आदी सोळा प्रकारच्या साहसी खेळांचा आनंद घेता येणार आहे. लहान मुलांसाठीही खास साहसी खेळांची व्यवस्था या वन पर्यटन केंद्राच्या आवारात करण्यात आली आहे. यासाठी प्रशिक्षित युवकांची टीम सज्ज होत आहे. ठाणे जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या निधीतून चार वर्षांपूर्वी वनविभागाने माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी या गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे वन पर्यटन ग्राम वसवले. सभोवती घनदाट जंगल, तिन्ही बाजूला सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा, डोंगरमाथ्यावरून वेगाने वाहणाºया काळू नदीचे स्वच्छ, प्रदूषण मुक्तपाणी आणि नीरव शांतता यामुळे अल्पावधीतच हे पर्यटनस्थळ लोकप्रिय झाले.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. येथील जंगल आणि डोंगर माथ्यावर भटकंती करू इच्छिणाºया पर्यटकांना स्थानिक प्रशिक्षित तरुणांची टीम या निसर्गरम्य ठिकाणांची इत्थंभूत माहिती देण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. स्थानिक युवकांना ‘अॅडव्हेंचर वन झोन’ या संस्थेतर्फे सोळा प्रकारच्या साहसी खेळांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले आहे.
वन समिती करणार पर्यटन केंद्राचे व्यवस्थापन
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पुढाकाराने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत या वन पर्यटन केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन केल्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळाला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाºया पर्यटकांना चांगली सुविधा मिळाली असल्याचे सहायक वनक्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी सांगितले.