ठाणे : मातृभूमीसाठी आणि मातृभाषेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरू पाहण्याऱ्यांना येणारा काळ आणि येणाऱ्या अनेक पिढ्या माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन अभिनेते युवराज ताम्हनकर यांनी केले. जोशी-बेडेकर महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग आणि जन संज्ञापन व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर उपस्थित होत्या.
शनिवारी विद्या प्रसारक मंडळाच्या के.ग. जोशी कला आणि ना.गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयामध्ये प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन सोहळा झाला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन केले. प्राचार्या डॉ. नाईक यांनी कार्यक्रमाला असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगून विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात मराठी विभागाच्या प्राध्यापक शिशीर आंगणे यांनी ‘माझी मराठी, माझा अभिमान’ म्हणत मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये सर्वांनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन केले. तर ताम्हनकर यांनी भाषाशुद्धीच्या चळवळीचा उल्लेख करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेल्या इंग्रजी साठीच्या पर्यायी शब्दांचे योगदान सांगितले. मराठी विभागप्रमुख प्राध्यापक अनिल भाबड यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. भाग्यश्री हरले हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्राध्यापक संतोष राणे यांनी आभार मानले.