कल्याण : कल्याण-डोंबिवलीप्रमाणे आता टिटवाळ्यातही लवकरच अग्निशमन केंद्र चालू होणार आहे. मांडा टिटवाळा पूर्वेत उभे राहिलेल्या या केंद्रासाठी दोन फायर वाहने देण्यात आली आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. लवकरच हे केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
केडीएमसी हद्दीसह आसपासच्या परिसरात साधारण वर्षभरात ३०० ते ४०० आगीच्या घटना घडतात. कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन दलास पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, मुरबाड आदी आसपासच्या शहरातदेखील ही सेवा पुरविली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचविणे, झाडे पडण्याच्या घटना आदी जबाबदारीही पार पाडावी लागते.
सध्या केडीएमसीची चार अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. यात कल्याण पश्चिमेतील आधारवाडी या मुख्य केंद्रासह पूर्वेतील ‘ड’ प्रभाग आणि डोंबिवली पूर्वेत एमआयडीसी आणि पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागातील केंद्रांचा समावेश आहे. टिटवाळ्यात जेव्हा एखादी आगीची अथवा अन्य आपत्कालीन घटना घडते तेव्हा कल्याणमधील आधारवाडीतून अग्निशमन केंद्राची गाडी तेथे रवाना होते. परंतु, अरुंद रस्ते आणि वाहतूककोंडीतून वाट काढत तेथे पोहोचताना विलंब होतो. त्यामुळे टिटवाळ्यात नव्याने सुरू होणारे अग्निशमन केंद्र ही स्थानिकांसाठी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. येथील कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी येथे स्थानक प्रमुखासह चार लिडींग फायरमन, चार वाहनचालक, ११ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-------------------------------
अपुऱ्या मनुष्यबळाचे काय?
- आधीच्या चार केंद्रांवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फरफट सुरू असताना टिटवाळा केंद्रावरही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी यंत्रणेची दमछाक होण्याची शक्यता आहे.
- तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या कामामध्ये साधारण अधिकारी, कर्मचारी आणि वाहनचालक असे एका केंद्रावर ३३ जणांची आवश्यकता असते, परंतु मनुष्यबळाअभावी १५ ते २० जणच उपलब्ध असतात. त्यांना तीन शिफ्टमध्ये विभागले जाते. त्यामुळे जेमतेम एका शिफ्टमध्ये सात ते आठ जणच सेवेला असतात.
- २०१५ मध्ये फायरमन पदांसाठी ऑनलाइन परीक्षाही घेण्यात आली होती. यात ५९ जण पात्र ठरले होते, परंतु यातील केवळ २४ जणच घेतले आहेत. उर्वरित पात्र झालेल्यांचे काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.
------------------------------------------------
लवकरच सेवेत दाखल होईल
टिटवाळ्यात अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार लवकरच ते केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पलावा येथील केंद्र बंद करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेतील २४ जण सेवेत दाखल करून घेतले आहेत. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ आहे.
- दिलीप गुंड, मुख्य अग्निशमन अधिकारी केडीएमसी
----------------------