टीएमटीच्या ताफ्यात येणार २०० नव्या बस, खरेदी प्रस्ताव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:04 AM2020-12-26T05:04:41+5:302020-12-26T05:05:05+5:30
Thane : ठाणे परिवहनच्या ताफ्यात ५१७ बस असल्या, तरी प्रत्यक्षात खासगी ठेकेदाराच्या मिळून २१० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत.
ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील आयुर्मान संपुष्टात आलेल्या २०० हून अधिक बस भंगारात काढून नव्या २०० बस घेण्याच्या प्रस्तावावर बुधवारी महासभेत चर्चा झाली. काही कमी आयुर्मान असलेल्या बसही भंगारात काढण्याचे नियोजन परिवहनने आखले होते. मात्र त्या दुरुस्त करून वापरण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यानुसार ५० हून अधिक बस दुरुस्तीचा आणि २०० नव्या बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात ५१७ बस असल्या, तरी प्रत्यक्षात खासगी ठेकेदाराच्या मिळून २१० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. दुरुस्तीसाठी २०० हून अधिक बस आगारात पडून आहेत. १० वर्षे आयुर्मान झालेल्या २३७ पैकी ६५ बस सध्या परिवहनच्या ताफ्यात आहेत. या बसचे सुटे भागही मिळणे दुरापास्त झाले आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि कमी बसगाड्यांमुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच २०० बस खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. काही बस तीन ते चार वर्षेच जुन्या असल्याने त्या भंगारात काढण्यास राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी आक्षेप घेतला. त्या, तसेच १५ व्होल्वो बस दुरुस्त करून वापरण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यास उपायुक्त संदीप माळवी यांनी होकार दिल्यानंतर मंजुरी दिली.
एका बससाठी ५० लाख रुपये
एका बस खरेदीसाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरून १०० कोटींचा प्रस्ताव आहे. मोठ्या आगाराच्या विकासासाठी २० कोटी, पायाभूत सुविधांसाठी ४० कोटी असा एकूण १६० कोटींचा प्रस्ताव आहे. यासाठी केंद्राकडून ६० कोटी आणि राज्य तसेच ठाणेपालिकेकडून ४० कोटींचा निधी लागणार आहे. आगारांचा विकासासाठी केंद्राकडून २० कोटी तर पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून २४ कोटी, राज्याकडून १६ कोटी अपेक्षित आहेत.