कल्याण : सोमवारी मातृदिनाचे औचित्य साधत केडीएमसीच्यावतीने पश्चिमेकडील आर्ट गॅलरी आणि डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल याठिकाणी कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेची ऑफलाईन सुविधा केवळ महिलांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कोविशिल्ड लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रेची लसीकरण सुविधा आणि उर्वरित २२ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेची सुविधा दिली जाणार आहे.
--------------------------------------------
दोन ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू
कल्याण : केडीएमसी प्रभाग क्रमांक ३ च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शालिनी सुनील वायले यांनी, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र आणि कॅब्रिया इंटरनॅशनल स्कूल याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविताच याठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून राधानगर आणि खडकपाडा परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला.
---------------------------------------------
पक्षवाढीवर चर्चा
कल्याण : अखिल भारतीय सेनेच्या कल्याण येथील ठाणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयात रविवारी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत पक्षवाढीच्यादृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष सुजित अनंत कदम यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुका लढविण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
---------------------------------------------------