डोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतल्या रहिवाश्यांचा टाहो :टँकर नको आमच्या घरातील नळाला पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:34 PM2017-12-01T16:34:27+5:302017-12-01T16:38:40+5:30
डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजेंद्र देवळेकरांशी चर्चा केली. पाण्याची समस्या सोडवा, टँकर वाढवा अशा सूचनाही दिल्या.
डोंबिवली: येथिल पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजेंद्र देवळेकरांशी चर्चा केली. पाण्याची समस्या सोडवा, टँकर वाढवा अशा सूचनाही दिल्या.
त्या भागातील गंगा सोसायटीमधील रहिवासी ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी खासदार शिंदेंची भेट घेत त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी शिंदेंनी ग्रामिण भागातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, लवकरच ती समस्या सुटेल. खासदार शिंदेंनी मध्यंतरी पाण्याच्या समस्येसाठी या ठिकाणचा पाहणी दौरा केला होता. त्याचवेळी जेथे समस्या आहेत त्या ठिकणी मुबलक पाण्याचे टँकर पुरवले जावेत अशा सूचना महापौर देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरेंसह महापालिका प्रशासन अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींना दिले होते. त्यानूसार आठवड्याला टँकर दोन-तीन वेळा टँकर मिळतात, पण त्याने काही भागत नाही, असे गाईगोळे म्हणाले. त्यामुळे नळाला पाणी हवे अशी मागणी त्यांनी केली. पाणी नसल्याने येथिल हजारो नागरिक त्रस्त असून दाद कोणाकडे मागायची असा सवालही त्यांनी केला.
खासदार शिंदेंनी तत्परता दाखवत तातडीने महापौर देवळेकरांशी संवाद साधला. त्यावर त्यांनीही त्या भागाची पाहणी करतो, तसेच पाणी पुरवठा विभागाकडून नेमक्या समस्येची माहिती घेतो, जास्तीचे टँकर त्या ठिकाणी कसे जातील याबाबत चर्चा करतो अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी ईद असल्याने महापालिका कार्यालय बंद होते, परिणामी गाईगोळे यांची महापौरांसमेवत भेट झाली नसून शनिवारी महापौर देवळेकरांनी भेटायला बोलावल्याचे सांगण्यात आले.
============