ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:42 AM2019-09-17T00:42:54+5:302019-09-17T00:42:57+5:30
ठाकुर्ली उड्डाणपूल परिसर आणि पश्चिमेतील सुभाष रस्ता, महात्मा फुले रस्ता, दीनदयाळ पथ या तिन्ही मुख्य रस्त्यांवर सोमवारी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
डोंबिवली : वाहतूक विभागाच्या योग्य नियोजनाअभावी ठाकुर्ली उड्डाणपूल परिसर आणि पश्चिमेतील सुभाष रस्ता, महात्मा फुले रस्ता, दीनदयाळ पथ या तिन्ही मुख्य रस्त्यांवर सोमवारी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले होते.
कोपर दिशेकडील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी रविवारी सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपूलमार्गे वळवण्यात आली आहे. त्यासाठी काही रस्ते वाहतूक एकदिशा मार्ग केले आहेत. तर, काही ठिकाणी पार्किंगला पूर्णत: बंदी आहे. ही नवीन वाहतूक व्यवस्था अमलात आणताना ३५ वाहतूक पोलीस व अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे.
पूर्वेला मंजूनाथ शाळेसमोरून व्ही.पी. रोडने उड्डाणपुलापर्यंत येणारा रस्ता हा एकदिशा मार्ग केला आहे. एमआयडीसीकडून येणाºया वाहनचालकांना याबाबतची माहिती नसल्याने ते मंजूनाथ शाळेजवळील वळणावर थांबत होते. तेथे वेळीच दुभाजक, बॅरिकेड्स लावले असते तर तेथील कोंडी काही प्रमाणात टळली असती. पण, अवघ्या दोन वाहतूक पोलिसांना कोंडी फोडता आली नाही. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सावरकर रोडमार्गे ठाकुर्ली पुलावर जाण्यासाठी वाहनांना पारसमणी चौकाला (टिळक पुतळा परिसर) वळसा घालून यावे लागत आहे. परंतु, तेथे वाहनांना यू-टर्न घेताना अडचणी येत आहेत. पंचायत बावडी, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली परिसर, हनुमान मंदिर परिसरातही कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. रस्ते, उड्डाणपूल अरुंद असल्याने कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.
पश्चिमेला रस्त्यांच्या दुतर्फा रिक्षा, वाहने उभी असल्याने कधी नव्हे तो सुभाष रस्त्यावरही प्रचंड कोंडी झाली होती. महात्मा गांधी रस्त्यावर वाहनांच्या रांगा झाल्या होत्या. तर ठाकुर्ली पुलावरची वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकत होती. कोपर दिशेकडून पूर्वेला जाणारी वाहतूकही महात्मा गांधी रस्त्याने जात असल्याने स्थानक परिसरात कोंडी झाली होती.
रविवार सुटीचा वार असल्याने अनेक रहिवासी कुटुंबीयांसह बाहेर पडले होते. त्यांना त्याचा फटका बसला. त्या तुलनेने पूर्वेला मात्र जोशी हायस्कूलजवळील परिसर वगळता काही वेळ इंदिरा गांधी चौकात वाहतूककोंडी झाली होती. परंतु, स्वामी विवेकानंद रस्ता, दत्त मंदिर चौक, टंडन रस्ता, राजाजी पथ आदी भागांत मात्र कोंडी झाली नव्हती. एस.व्ही. रस्त्यावर वाहतूक पोलीस कार्यरत होते. तेथील कोंडी त्यांनी सोडवल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला. चाररस्ता, तसेच आइस फॅक्टरीजवळ कोंडी झाली होती.
खड्ड्यांतून वाट काढताना कसरत
घरडा सर्कल, पारसमणी चौक, सारस्वत कॉलनी येथील खड्डे तसेच पश्चिमेला महात्मा गांधी रस्त्यानंतर उड्डाणपुलाकडे येणाºया कच्च्या रस्त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत झाली होती. त्यात येजा करणाºया पावसाच्या लहानमोठ्या सरींमुळेही कोंडीत भर पडली होती.
रविवारपेक्षा सोमवारचे नियोजन करणे सोपे गेले. आता वॉर्डन ठिकठिकाणी कार्यरत झाले आहेत. अजून महापालिकेकडून १० वॉर्डन मिळणार असून, आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. आता फलक बहुतांशी मोक्याच्या ठिकाणी लागले आहेत. चांगले नियोजन करून वाहनचालकांना दिलासा मिळेल.
- सतेज जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वाहतूक नियंत्रण विभाग, डोंबिवली