आंध्र प्रदेशातील गांजाची ठाण्यात तस्करी, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 08:20 PM2017-11-30T20:20:40+5:302017-11-30T20:21:03+5:30
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणा-या शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
ठाणे : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणाºया शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
बिर्ला याला बुधवारी (२९ नोव्हेंबर रोजी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्या पथकाने भिवंडी बायपासजवळील रांजनोलीनाका येथे अटक केली. त्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील परिसरातून किरणला घाडगे यांच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून एका कारसह सहा लाख ४१ हजार २०० रुपयांचा २२ किलो गांजा हस्तगत केला. त्याने दिलेल्या माहितीवरूनच शाहरूखला या पथकाने अटक केली. हे दोघेही आंध्र प्रदेशातील गणेशन याच्याकडून हा गांजा ठाण्यात तस्करीसाठी आणत होते. पुण्याचा विशाल मोहिते आणि गणेशन हे दोघे मिळून या गांजाची तस्करी करत होते, अशीही माहिती तपासात उघड झाली. घुडे आणि शाहरूख हे गणेशन याच्याकडून साडेसात हजार रुपये किलोने गांजाची खरेदी करत होते. पुढे ते मुंबई, ठाण्यात १५ हजार रुपये किलोने त्याची विक्री करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आंध्र प्रदेशात पथक रवाना
ठाण्यात गांजाची तस्करी करणाºया गणेशन तसेच त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार उत्तम भोसले, दिलीप सोनवणे आणि तुळशीराम टोपले यांचे पथक आता गुरुवारी आंध्र प्रदेशात रवाना झाले आहे. तस्करी करणा-यांच्या अटकेनंतर या प्रकरणात सामील असलेल्या आणखी मोठ्या रॅकेटचाही भंडाफोड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.