मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गांवर महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या कार्यक्षमतेवर ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली जात नाही, आधुनिक तंत्राचा वापर करत सुरक्षेवर गांभीर्याने काम केले जात नाही. त्यामुळेच गुन्हेगार निडरपणे समाजात वावरतात. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेच्या बळकटीकरणावर, तेथील मनुष्यबळ वाढवण्यावर भर द्यायला हवा. संकटातील सहप्रवाशाला मदत करण्यासाठी अन्य प्रवाशांनीही पुढे येण्याची गरज आहे, असा सल्लाही वाचकांनी दिला आहे.महिला सुरक्षेबाबत गांभीर्याने काम करण्याची गरजरेल्वेतील प्रवासी सुरक्षा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. रेल्वे प्रशासन तिकीट दराव्यतिरिक्त सुरक्षा अधिभार लावते, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ, जीआरपी अशा सुरक्षा तैनात असल्या तरी, कुणाही प्रवाशाला सुरक्षिततेची खात्री वाटत नाही. महिला आणि मुलींना तर अधिकच भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागत आहे. महिलांच्या डब्यात २४ तास पोलीस तैनात केल्याचा दावा केला जातो. मात्र तरीही महिलांबाबतचे गुन्हे काही थांबायचे नाव घेत नाहीत हेदेखील तितकेच खरे आहे. सुरक्षा यंत्रणा अपुरी आहे हे मान्य करावेच लागेल. महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच स्थानकांवरील गर्दीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच यापुढील काळात तरी रेल्वे प्रशासनाने महिला सुरक्षिततेबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.- अनंत बोरसे, शहापूरप्रवाशांनीही सजग राहिले पाहिजेआज भारतीय रेल्वे कात टाकत असताना, बुलेट, मेट्रो, एसी लोकलसारख्या सुविधा देण्यासाठी सरकार काम करीत आहे. यामध्ये सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. प्रवास करताना महिला, मुले, ग्रामीण भागातील प्रवासी यांना सुरक्षा दिली पाहिजे. यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक स्थानकावर व फलाटावर सुरक्षारक्षक २४ तास तैनात असणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मध्यवर्ती कार्यालयाशी जोडून, २४ तास त्या माध्यमातून टेहळणी करणे आवश्यक आहे. आपला कोणीतरी विनयभंग करीत आहे, हे समजताच महिला प्रवाशांनी सर्वप्रथम मोठमोठ्याने आजूबाजूच्या प्रवाशांशी संवाद साधावा, मोबाइलवर जवळपास कोणीतरी आहे, असे भासवावे; तसेच स्वत: सावधपणे प्रवास करणेही गरजेचे आहे.- बाळासाहेब लेंगरे, सदस्य,प्राणी कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्यअसुरक्षेचे भय वाढत आहे : गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना रेल्वेत असुरक्षित वाटते आणि त्याचे भयही वाढत चालले आहे. दुर्दैवाने असा अनुभव सर्व रेल्वेमार्गांवर येत असूनही रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. महिला पोलिसांची संख्या वाढवून त्यांना रेल्वे स्थानकांत २४ तास ठेवणे, महिला डब्यात पुरेसे संरक्षण पुरविणे, हेल्पलाइनला त्वरित प्रतिसाद देणे व सतत आढावा घेऊन आवश्यक ते बदल करीत जाणे गरजेचे आहे. अनेक दुर्दैवी घटना घडल्यानंतर तरी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. महिला प्रवाशांनीही गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरच याला आळा बसू शकेल. - अनिल पालये, बदलापूरगुन्हेगार निडरपणे फिरत आहेत : माटुंगा रोड स्थानकावरील घटनेने कायदा कागदावरच बलवान असल्याचे दिसून आले. सुरक्षा यंत्रणेने विकृताला पकडूनही तक्रारीअभावी सोडले. सराईत गुन्हेगार पुन्हा विकृती करायला मोकळा झाला. असे असले तरी प्रशासन, सुरक्षा यंत्रणेने सेवाव्रती बनून डोळस व्हावे. चोवीस तास शस्त्रधारी रक्षकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. याशिवाय महिला डब्यातील प्रत्येक खबर तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षा व्यवस्थेला पोहोचणे जरुरीचे आहे. महिलांनी अबला न राहता निडर सबला बनून तक्रार दाखल करायला हवी. डब्यातील एकटीचा प्रवास टाळून सुरक्षा साहाय्य मागावे. - सुरेश वाघ, अंधेरीपोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नाहीमहिलांवर अन्याय, हिंसक कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे नव्याने गुन्हे करण्याची वृत्ती बळावते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत; पण, रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणी करताना संशयिताला तत्काळ ताब्यात घेत सर्वांसमक्ष कारवाई केली पाहिजे. तसेच यात सातत्य असणे गरजेचे आहे. आमदार, नगरसेवक यांनी आपापल्या क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील अधिकाºयांना गुन्ह्यांची माहिती, त्यावरील कारवाई यांचा नियमित जाब विचारल्यास महिलांच्या सुरक्षेवर वचक राहील, अन्यथा नाही. विशेष गाड्या सोडून महिलांच्या गर्दीवर उपाय केला. मात्र फलाटांवरील पुरुषी मनोवृत्तीवर आळा घालण्याचे प्रयत्न होत नाहीत. रात्री आणि गर्दीच्या वेळी होमगार्ड, रेल्वे सुरक्षा दल फलाटांवर तैनात केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकते. महिलांसह, सर्वसाधारण प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन करणे टाळावे, प्रवासादरम्यान मोबाइलला आपले सर्वस्व वाहण्यापेक्षा, जागृत राहून स्वयंसुरक्षेवर लक्ष केंद्रित केल्यास गुन्हे सहजासहजी घडणार नाहीत. प्रवासातील धोके लक्षात घेऊन सदैव जागरूक राहणे हा उत्तम उपाय आहे.- राजन पांजरी, जोगेश्वरीदुर्लक्ष केल्यामुळेच घटनांची पुनरावृत्तीप्रत्येक महिला प्रवाशाची असुरक्षितता रेल्वे स्थानकात प्रवेश करताक्षणी वाढू लागते. प्रवासादरम्यान सहप्रवाशांकडून होणारी छेडछाड, शरीरस्पर्श, विनयभंग, धक्काबुक्की, बसण्याच्या आणि उभे राहण्याच्या जागेवरून होणारे वाद असे नेहमीच घडणारे प्रसंग महिला रेल्वे प्रवाशांना अनुभवावे लागतात. आॅफिस, घर गाठावयाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते पुन्हा पुन्हा घडत राहतात. अपरिहार्य गर्दीमुळे तसेच उतरण्यासाठी फूटबोर्डवर उभे राहिल्यास रेल्वेमार्गांवरून हातातील वस्तू हिरावून घेणे, हातावर काठ्या मारणे असे प्रकार घडतात. विकृतांकडून, तृतीयपंथीयांकडून होणाºया त्रासावर तत्काळ कारवाई होत नाही. रेल्वे प्रशासन आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा ही ‘सरकारी यंत्रणा’ असल्याने गतीचा अभाव आहे. तेव्हा प्रत्येक प्रवाशाने आपणास जमेल तशी स्वत:ची सुरक्षा करण्याचे प्रयत्न करावेत. स्वयंसिद्ध असल्यास सुरक्षितता वाढेल आणि अन्याय, अत्याचार झाल्यावर तातडीचा न्याय मिळवता येईल.- स्नेहा राज, गोरेगावप्रशासन कुचकामीपणे काम करतेवर्षभरात रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड व विनयभंगाची दीडशे प्रकरणे ही केवळ नोंद केलेली आहेत. गर्दीचा फायदा घेत विकृत मनोवृत्तीतून रोजच शेकडो प्रकरणे घडत आहेत. पोलिसांच्या तपासातील ससेमिरा, दगदग व रोजच प्रवास करावा लागत असल्याने महिला प्रवासी तक्रार करण्यास धजावत नाहीत. तक्रार केली तर सूडबुद्धीतून त्रास देणारे महाभाग काही कमी नाहीत. आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घाला कशाला? म्हणून महिला गप्प राहणे पसंत करतात. वर्षानुवर्षे गर्दीतही महिलांच्या डब्यात पुरुष विक्रेते घुसतात. रेल्वे सुरक्षा बल वा रेल्वे पोलीस अशा विक्रेत्यांना आवर का घालत नाहीत? एखादा विकृत वा दारूडा एकाकी महिला पाहून महिलांच्या डब्यात शिरून छेडछाड करतो. महिलांच्या डब्यात पोलीस बंदोबस्त वाढवला जाईल, अशी घोषणा होते. मात्र ती फक्त अशी घटना घडल्यानंतरची घोषणाच ठरते. कारण नंतर सारे थंडावते. आता तर म्हणे रात्री घरापर्यंत महिलांना पोलीस सुरक्षा दिली जाणार आहे. प्रवासापुरती सुरक्षा पुरवली तरी पुरेशी आहे. स्थानके व रेल्वेतील सीसीटीव्ही वाढवावेत, वरचेवर फूटेज तपासले जावे. ज्या स्थानकांत असे प्रकार अधिक घडतात तेथील सुरक्षा बलाने अधिक सतर्कता बाळगावी.- मुरलीधर धंबा, डोंबिवली
प्रवासी कट्टा : आधुनिक तंत्राचा वापर करत सुरक्षा सुसज्ज करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 2:07 AM