ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील खासगी आणि एक दिवसीय काळजी केंद्रांच्या नूतनीकरण शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर येत्या महासभेत चर्चा होणार आहे. त्यानुसार या नूतनीकरण शुल्कामध्ये २५० रुपयांपासून १ लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यापूर्वी १५० पेक्षा जास्त बेडच्या रुग्णालयांना १० लाख रुपये शुल्क होते. नव्या प्रस्तावात अशा रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखांपर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या भरमसाठ शुल्कवाढीमुळे अगोदरच खर्चिक असलेले खासगी रुग्णालयांतील उपचार आणखी महागण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत मार्चपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयासोबतच शहरातील काही खासगी रुग्णालयातही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मधल्या काळात काही खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले वसूल केल्याची काही उदाहरणे पुढे आली होती. यामुळे रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला होता. त्यात आता शहरातील खासगी रुग्णालये आणि एक दिवसीय काळजी केंद्राच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी हे शुल्क निश्चित करण्यात आले असून त्याचा फटका संबंधित रुग्णालय व्यवस्थापनांसह सर्वसामान्य ठाणेकरांनाही सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, नव्या प्रस्तावानुसार शहरातील १ ते १५० बेडच्या खासगी रुग्णालयांच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये २५० ते १ लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यापूर्वी १५१ पेक्षा जास्त बेड असतील तर दहा लाख रुपये शुल्क होते. मात्र, नव्या प्रस्तावात अशा रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखापर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी हे दर असणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
............
ठाणे शहरामध्ये शासकीय आणि खासगी अशी एकूण ३७६ रुग्णालये आहेत. त्यामध्ये ३४७ खासगी रुग्णालये, महापालिकेची २६ आरोग्य केंद्र, कळवा येथील महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे.
...............