बेवारस मुक्या प्राण्यांवर आता ठाण्यात थंडगार कक्षेत होणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 08:21 PM2018-01-10T20:21:45+5:302018-01-10T20:28:14+5:30
पंकज रोडेकर
ठाणे : बेवारस मुक्या प्राण्यांसाठी मोफत उपचार करणा-या ठाणे एसपीसीए या (एनजीओ) संस्थेत आता मुक्या प्राण्यांसाठी खास करून ‘अतिदक्षता कक्ष’ उभारण्यात येत आहे. हा कक्ष लोकसहभागातून उभा राहत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लाखो रुपये खर्चुन तयार होणाºया या कक्षात उपचारार्थ दाखल होणा-या बेवारस मुक्या प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेत. अशाप्रकारे बेवारस प्राण्यांसाठी अतिदक्षता कक्ष उभारणारी बहुदा राज्यातील पहिलीच संस्था असावी अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील ब्रम्हांड या परिसरात ठाणे एसपीसीए ही संस्था गेली १७ वर्ष कार्यरत आहेत. या संस्थेत ठाणे शहरासह, घोडबंदर ,डोंबिवली, मुलूंड-भांडूप, पवई आदी आजूबाजूच्या परिसरातील बेवारस मुक्या प्राण्यांना पशु-पक्षीमित्र उपचारार्थ दाखल करतात. सनस्ट्रोक असो या कुलस्ट्रोक किंवा अपघातांमुळे जखमी होणारे अशाप्रकारे दरवर्षी साधारणत: ५ ते ६ हजार मुक्या प्राण्यांना उपचारार्थ दाखल केले जाते. उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना मुक्त संचारासाठी पुन्हा सोडले जाते. आतापर्यंत या संस्थेत उपचारार्थ कावळा,चिमण्यांसह काही दुर्मिळ पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, ससाणे, घुबड,आदी पक्षी दाखल झाल्यानंतर उपचार घेऊन मुक्त संचार करू लागले आहेत. त्याचबरोबर कुत्रा-मांजर, घोडा,माकड, गाढव, ससा-कासव,बोकड यासारख्या प्राण्यांवर यशस्वी उपचार केले आहेत. तर, उपचारार्थ दाखल केल्यानंतर, एखाद्या पशु-पक्ष्याला अतिदक्षता कक्षेत ठेवण्याची गरज भासते. मात्र, हा कक्ष या संस्थेत नसल्याने त्यांचे दगावण्याचे प्रमाण लक्षात घेऊन तो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तो लोकसहभागातून उभा राहत आहे. तसेच येत्या काही दिवसात तो सुरू होईल असेही सूत्रांनी सांगितले.
* असा आहे अतिदक्षता कक्ष
७ बाय १० चा अतिदक्षता कक्ष तयार क रण्यात येत आहे. यामध्ये दोन टेबल असून आॅक्सिजनपासून आवश्यक असलेली सर्व उपचार साधनसमुग्री उपलब्ध आहे.
* २२ जणांचा फौजफाटा
या संस्थेत उपचारार्थ दाखल होणा-या पशु-पक्ष्यांसाठी एका मुख्य डॉक्टरांसह ७ डॉक्टर तसेच एकूण २२ जण त्यांची निगा आणि उपचारार्थ कार्यरत आहेत. त्याचबरोबर चार रुग्णवाहिकाही आहेत.
‘‘बेवारस मुक्या प्राण्यांसाठी ठाण्यात अतिदक्षता कक्ष सुरू होत आहे. हा कक्ष येत्या आठवडाभरात कार्यान्वित होईल. तसेच तो लोकसहभागातून उभा राहिला आहे.’’-डॉ.सुहास राणे,
...............