ठाणे - कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारात बाजूबाजूला उभ्या केलेल्या दोन रुग्णवाहिकांवर वृक्ष उन्मळून पडल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन्ही रुग्णवाहिकांच्या छताचे किरकोळ नुकसान झाले आहे. एकीकडे बुधवारी दिवसभर अवकाळी पाऊस सुरू होता. पाणी तुंबणे आणि झाडाची फांदी पडणे या घटनांव्यतिरिक्त अन्य कोणतीही घटना घडली नव्हती. मात्र, अचानक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील आवारात वृक्ष उन्मळून दोन रुग्णवाहिकांवर पडले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, तातडीने आपत्ती विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने ते वृक्ष बाजूला करण्याचे काम हाती घेतले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसून रुग्णवाहिकांच्या छताचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली. तसेच यावेळी एक क्युआर व्ही वाहन आणि एक जेसीबी पाचारण केले होते, असेही सांगितले.
घंटाळीत झाडाची फांदी पडली
ठाणे शहरातील नौपाडा येथील घंटाळी परिसरात एका झाडाची फांदी उभ्या केलेल्या चार दुचाकी गाड्यांवर पडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत किंवा वाहनांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.