ठाणे: रविवारची सकाळ निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा आनंद ठाण्यातील निसर्ग प्रेमींनी घेतला. शहरातील भारतीय आणि परदेशी झाडांची ओळख करुन घेताना त्यांनी झाडांची जणू काही सफारीच केली. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे ओळख झाडांची या विषयावर रविवारी ब्रह्माळा तलाव येथे निसर्ग भटकंती आयोजित केली होती. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. पर्यावरण अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी सहभागी निसर्गप्रेमींना मार्गदर्शन केले. ब्रह्माळा तलावाची माहिती देताना त्यांनी ठाण्यातील तलावांचा इतिहास सांगितला. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुर्वी १३० हून अधिक तलाव शहरांत होती, कालांतराने ती नष्ट होत ३० च्या आसपास तलाव आहेत. त्यापैकी ब्रह्माळा तलाव एक आहे असे त्या म्हणाल्या. ब्रह्माळा तलावालगत असलेल्या पाम ट्री, शेवगा, आसुपालव, पर्जन्य वृक्ष, पांगारा, आपटा, कांचन, कन्हेर, बकुळ, करंज आणि कदंब, बोगनवेल, वावळा, वड, पिंपळ, औदुंबर, पेरु, नारळ, अनंत, सुबाभुळ, पिवळा सोनमोहर, गुलमोहर, नारळ, कडुनिंब अशा अनेक झाडांची ओळख करुन देत त्यांची वैज्ञानिक नावे, औषधी उपयोग, त्याची पौराणिक माहिती सांगितली. यात कोणती झाडे लावावी आणि कोणती लावू नये याचेही विश्लेषण म्हस्के यांनी केले. पर्जन्य वृक्ष, पाम ट्री, आशुपालव, बोगनवेल, शुबाभूळ, सोनमोहर, गुलमोहर ही भारतीय झाडे नसून परदेशी आहेत. ही झाडे लावणे प्राणी - पक्ष्यांसाठी उपयोगी नसल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याकडे विविध प्रकारांची आणि उपयुक्त भारतीय झाडे असताना परदेशी झाडे का लावली जातात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. लहान मुले ही सर्व माहिती आपल्या वहीत टिपत होती तर ज्येष्ठ नागरिकही तितक्याच आवडीने ऐकत होते. रविवारची सकाळ निसर्गाच्या सान्नीध्यात घालविल्याचा आनंद या निसर्गप्रेमींच्या चेहऱ्यावर होता. यावेळी त्यांनी म्हस्के यांना आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या. त्यांनीही त्यांच्या शंकांचे योग्य माहिती देऊन निरसन केले.
ठाण्यातील निसर्गप्रेमींनी केली वृक्ष सफारी, झाली झाडांची ओळख आणि वृक्षांची उपयुक्त माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 5:14 PM
रविवारच्या सकाळी ठाणेकरांनी वृक्ष सफारी करण्याचा आनंद लुटला.
ठळक मुद्देनिसर्गप्रेमींनी केली वृक्ष सफारीपर्यावरण दक्षता मंडळातर्फे ओळख झाडांची या विषयावर निसर्ग भटकंतीपर्यावरण अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी सहभागी निसर्गप्रेमींना केले मार्गदर्शन