राजू काळे भाईंदर : एरव्ही पोस्टात आलेली पत्रे आणि पार्सल्स वेगवेगळ्या पत्त्यांवर बिनचूकपणे पोहोचवणाऱ्या भार्इंदरच्या एका पोस्टमनने रविवारी वडिलांपासून दुरावलेल्या चिमुकल्याची पुन्हा गाठभेट घालून दिली. लोकल पकडण्याच्या घाईगडबडीत हा चिमुकला वडिलांपासून दुरावला होता.
रविवारी पोस्टाला सुट्टी असल्याने भार्इंदर पश्चिमेच्या देवचंदनगर येथे राहणारे पोस्टमन संदीप घाग हे दादर येथे त्यांच्या भावाला भेटण्यास गेले होते. ते दादर स्थानकात उतरत असतानाच एका बापलेकाची जोडी लोकलमध्ये चढताना त्यांना दिसली; मात्र तेवढ्यात लोकल सुरू झाली. मुलाच्या वडिलांनी लोकल पकडली; मात्र मुलगा प्लॅटफॉर्मवरच राहिला. वडिल निघून गेल्याने सात वर्षीय मुलगा भांबावला. तो घाबरुन रडू लागला. तिथे थांबलेल्या पोस्टमन घाग यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी मुलाला जवळ घेऊन त्याचे नाव विचारले. त्याने आपले नाव नौतिक शेलार असे सांगितले. घाग यांनी त्याला धीर देत, वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळवला. घाबरलेल्या मुलाने सुरुवातीला चुकीचा मोबाइल क्रमांक दिला. घाग यांनी धीर दिल्यानंतर त्याने वडिलांचा योग्य मोबाईल क्रमांक त्यांना दिला. त्यानंतर घाग यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधून नौतिक आपल्यासोबत असल्याची माहिती त्यांना दिली. दरम्यान, नौतिकशी ताटातूट झाल्याने त्याचे वडिलसुद्धा घाबरले होते. नौतिक सुखरूप असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुंबई सेंट्रल येथून पुन्हा दादर स्थानक गाठले. तिथे संदीप घाग यांच्यासोबत नौतिकला पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. संदीप घाग यांचे आभार मानून त्यांनी नौतिकला ताब्यात घेतले. वडिलांच्या कुशीत सामावल्यानंतर नौतिकला वेगळा आनंद मिळाला. प्रवासात मुलांची योग्य काळजी प्रत्येकाने घ्यावी, असा सल्ला घाग यांनी यानिमित्ताने दिला.एरव्ही पोस्टात आलेली पत्रे त्या-त्या परिसरातील पत्यांनुसार वेगवेगळी करुन अचूक ठिकाणी पोहोचविणाºया पोस्टमन संदीप घाग यांनी रविवारी माणुसकीचे कर्तव्य बजावले. वडिलांपासून दुरावलेल्या नौतिकला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी त्यांनी धडपड केली. मुलगा परत मिळाल्याचा आनंद वडिलांच्या चेहºयावर मावत नव्हता. घाग यांचे परिसरात कौतूक होत आहे.