कल्याण : शहरातील आधारवाडी कारागृहात ५४० कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता असताना त्यात तिप्पट म्हणजेच एक हजार ५६८ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. हे कारागृह ‘ओव्हरलोड’ झाल्याने नव्याने येणाऱ्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जात आहे. त्याचबरोबर कारागृहाची दुरुस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही काही महिन्यांपासून ‘लालफिती’त अडकल्याने कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने १९७६ ला कल्याणमध्ये नऊ हेक्टर (२४.२२ एकर) जमिनीवर तळ अधिक एक मजल्याचे लोड बेअरिंग पद्धतीने आधारवाडी कारागृह बांधले. त्यातील चार एकरचा वापर कैद्यांसाठी होत आहे, तर उर्वरित जागेत मैदान आणि अधिकारी-कर्मचाºयांची वसाहत आहे. सध्या कारागृहात नऊ विभाग आहेत. त्यातील एक विभाग महिला कैद्यांसाठी आहे.कल्याण-डोंबिवली, कर्जत, टिटवाळा, शहापूर, वांगणी, उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, बदलापूर या परिसरांतील आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येते. कारागृहाची कैदी क्षमता ५४० इतकी आहे. त्यात महिला कैद्यांची क्षमता ३५ आहे. परंतु, प्रत्यक्षात सध्या या कारागृहात एक हजार ५६८ कैदी आहेत. त्यातील ९७ महिला, तर उर्वरित एक हजार ४७१ पुरुष कैदी आहेत. महिला कैद्यांची मुलेही त्यांच्यासोबत आहेत. कारागृहात कैद्यांसाठी पुरेसे बरॅक नसल्याने त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. कारागृहात झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कैद्यांमध्येही वादविवाद होतात. या सगळ्यांचा भार कारागृह प्रशासनावर पडत आहे.काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपींना जागेअभावी कारागृहात ठेवण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. नवीन कैद्यांनाही तेथेच हलवले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.तळोजा, ठाणे मध्यवर्ती कारागृह, आर्थर रोड आणि आधारवाडी अशी चार मोठी कारागृहे आहेत. कल्याण परिसरातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे कैद्यांची संख्या वाढत आहे. काही प्रकरणांत कैद्यांना जामीन होत नाही, तर काहींना जामीन देण्यासाठी कोणीच नसतो. त्यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असते. असे कैदीही येथे आहेत. आधारवाडी कारगृहाची क्षमता वाढवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सरकारदरबारी त्याला अजूनही यश मिळालेले नाही. कैद्यांच्या तुलनेत प्रसाधनगृह आणि बरॅक्सची संख्या कमी पडत असल्याने त्यांची वारंवार दुरुस्तीही करावी लागत आहे.