लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मिलेनियम प्लस अर्थात दहा लाखांवरील शहरांना हवेची गुणवत्ता राखण्यासह पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधींचे अनुदान दिल्यानंतर आता नॉन मिलेनियम प्लस अर्थात दहा लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांनाही पिण्याचे पाणी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पहिला हप्ता म्हणून २७६ कोटी ६० लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १० शहरांच्या वाट्याला १२ कोटी २५ लाख २६ हजार ६३४ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यात सर्वाधिक सात शहरे पालघर जिल्ह्यातील असली तरी तीन शहरे असलेल्या ठाणे जिल्ह्याला नऊ कोटी ४० लाख ३४ हजार ५५० रुपये मिळणार आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिंवडी महापालिकेला ८ कोटी ९४ लाख २५४ रुपये मिळणार असून, मुरबाड नगरपंचायतीला २९ लाख ६५ हजार ९०५, शहापूर नगरपंचायतीस १६ लाख ६८ हजार ३९१ रुपयांची मदत मिळणार आहे. पालघरच्या जव्हार नगर परिषदेला १६ लाख २६ हजार २५५, डहाणू नगर परिषदेस ६९ लाख १७ हजार २२, पालघर नगर परिषदेला १ कोटी आठ लाख ७३ हजार ५८६, विक्रमगड नगर पंचायतीला १४ लाख ६७ हजार ३६१, तलासरी नगरपंचायतीला ३० लाख ६६ हजार ६२१, वाडा नगरपंचायतीस २४ लाख ७५ हजार १६ आणि मोखाडा नगरपंचायतीस २० लाख ६६ हजार २२५, असे २ कोटी ८४ लाख ९२ हजार ८४ रुपयांची भरीव मदत मिळणार आहे.
या निधीतून पिण्याच्या पाण्याच्या साठवण क्षमता वाढविण्यासह पाण्याचा पुनर्वापर आणि रेन वाॅटर हार्वेस्टिंगद्वारे आपल्या परिसरातील पाणीटंचाईवर या शहरांना मात करणे सोपे होणार आहे. कारण उन्हाळ्यात या सर्वच शहरांत तीव्र पाणीटंचाई जाणवते.