कत्तलीसाठी जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे फरारी आरोपी मुंब्य्रातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:34 PM2019-09-16T22:34:06+5:302019-09-16T22:40:08+5:30
नवी मुंबईतील तुर्भे, पनवेल शहर, पनवेल तालुका आणि पालघर जिल्हयातील कासा भागातील मोकाट जनावरांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केल्यानंतर त्यांची कत्तलीसाठी चोरी करणा-या टोळीतील असिफ कुरेशी आणि मोसिन कुरेशी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मुंब्रा येथून नुकतीच अटक केली आहे. त्यांच्या अन्य साथीदारांना यापूर्वीच अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे : कत्तलीसाठी जनावरांची चोरी करणा-या टोळीतील फरारी आरोपी असिफ ऊर्फ मुन्ना कुरेशी (२९, रा. रशीद कम्पाउंड, मुंब्रा, ठाणे) आणि मोसिन ऊर्फ फिन्ना पिदा कुरेशी (२३, रा. कौसा, ठाणे) या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले. या दोघांनाही आता नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तुर्भे, पनवेल शहर, पनवेल तालुका आणि कासा, पालघर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात जनावरे चोरणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी टेम्पोवरील चालकांना जादा भाडे देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून टेम्पो भाड्याने घेते. तसेच त्यावरील चालकाला भाड्याबाबत दिशाभूल करून त्यास रस्त्यावर उतरवून देत असल्याची माहिती जमादार श्यामराव कदम यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांच्या पथकाने मुंब्रा भागातून असिफ आणि मोसिन या दोघांनाही १४ सप्टेंबर रोजी अटक केली. रस्त्यावर बसलेल्या जनावरांना भूलचे इलेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केल्यानंतर टेम्पोमध्ये टाकून त्यांची ते चोरी करायचे. याच जनावरांची विनापरवाना वाहतूक करून ती कत्तल करण्यासाठी विक्री करीत असल्याचेही चौकशीमध्ये उघड झाले आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील तुर्भे, पनवेल, पनवेल तालुका, खांदेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यांमध्ये चोरीसह पशुसंरक्षण कलम ११ नुसार प्राण्यांच्या परिवहन कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील काही आरोपींना यापूर्वीच संबंधित पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे हे दोघे साथीदार मात्र गेल्या काही दिवसांपासून पसार झाले होते. ते मुंब्रा भागात वास्तव्य करीत असल्याची माहिती जमादार कदम यांना मिळाली होती. याच माहितीची खातरजमा करून ठाणे मालमत्ता शोध कक्षाच्या पथकाने त्यांना अटक केली.