सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 05:46 AM2020-12-10T05:46:57+5:302020-12-10T05:48:24+5:30
cylinder blast : भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
भिवंडी : तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
प्रेम अनंत भोईर (२२) व अक्षय गौतम (२१) अशी मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. पारसनाथ कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात अनेक छोटे-मोठे कारखाने व गोदामे असून या ठिकाणी ईजी स्टील वेल्डिंग कारखान्यात कामगार काम करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की परिसरात सर्वत्र या स्फोटाचा आवाज ऐकायला आला. समोरील इमारतीच्या भिंतीलाही तडे गेले असून येथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी माणकोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
विशेष म्हणजे या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य दखल घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असतानाही येथील कारखाना मालक कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना का करीत नाहीत, असा सवाल वारंवार उपस्थित होत आहे.
एकाची प्रकृती चिंताजनक
n या सिलेंडर स्फोटात एकूण चार जण जखमी झाले असून त्यातील मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन ( रा.भिवंडी ) विवेकानंदा बारीकी (रा. वळपाडा ), बजरंग शुक्ला ( रा.पारसनाथ कंपाऊंड ) या तिघा जखमींवर मानकोली नाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर अल्पेश भोईर ( रा. वाडा ) याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . दरम्यान घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे. चौकशीअंती या मध्ये दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.