प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात उन्हाची चाळीशी गाठल्या गेल्याने मनुष्याबरोबर पशु पक्ष्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. उंच आकाशात झेप घेणाऱ्या वन्य पक्ष्यांना भोवळ येऊन खाली पडण्याचे प्रकार शहरात सर्रास पाहायला मिळतात. असाच एक प्रकार ठाणे शहरातील तीन हात नाका येथे घडला. एक घुबड उष्मआघातमुळे घरात येऊनच धडकले. ही माहिती मिळाल्यावर पक्षी मित्र असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी या घुबडाला ताब्यात घेऊन त्यावर उपचार करुन आज त्याला नैसर्गीक अधिवासात सोडून दिले.
या गरुडाला मराठीत तुरेवाला गरुड असेही संबोधतात. गुरुवारी तीन हात नाका येथील वास्तू शिल्प या सोसायटीत एका कुटुंबाच्या घरात हा गरुड उन्हाच्या तडाख्यात सापडल्याने खिडकीतून येऊन घरात पडला. त्यांनी लागलीच जीवोहम चॅरिटीजचे अध्यक्ष सर्पमित्र चंद्रकांत कंगराळकर यांना कळवले. त्यांनी ही माहिती डिके आणि शिरसाठ यांना कळविले. त्यांनी त्यांच्या घरातून हे गरुड ताब्यात घेतले आणि उपचारासाठी डॉ. किरण शेलार यांच्याकडे नेले. त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले आणि दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आज त्याला बरे वाटल्यावर नैसर्गीक अधिवासात सोडून दिले. हा गरुड जीवोहम चॅरिटीजचे सभासद सर्पमित्र किशोर साळवी, प्राणी मित्र तेजस बांगारे, भरत दिवा, प्रकाश कदम, सुधीर पवार, प्रकाश कदम यांच्या उपस्थितीत वनविभाग ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सोडण्यात आला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने पक्षी प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.