ठाणे : महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाजवळील नाल्यावर उभारलेल्या दुमजली पार्किंग प्लाझाचे अखेर रविवारी लोकार्पण होणार आहे. त्यामुळे या भागात रस्त्यावर होणारी कार पार्किंग आता या प्लाझात होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील पार्किंगपेक्षा येथील पार्किंगचे दर हे २५ टक्क्यांनी कमी असून याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे.शहरात वाहनतळांसाठी मुबलक जागा उपलब्ध नसल्याने ठाणे महापालिकेने सुमारे अडीच वर्षांपूर्वी नाल्यावरील पार्किंगचा प्रस्ताव पुढे आणला होता. त्यानुसार, पहिला प्रयोग त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील नाल्यावर करण्याचे निश्चित केले. मुख्यालयासमोरच कचराळी तलाव असल्याने या तलावाच्या अवतीभवती रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे त्याचे सौंदर्यदेखील हरपले होते. त्यामुळेच या भागात असलेल्या नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग प्लाझा उभारण्याचे काम मागील वर्षी मे महिन्यात सुरू केले. यासाठी १ कोटी २८ लाखांचा खर्च केला असून आता हे काम पूर्ण झाले आहे. आरसीसी पद्धतीच्या असलेल्या या कामात दुमजली पार्किंग प्लाझा उभारला आहे. त्यामध्ये एकाच वेळी ३० कार पार्क होऊ शकणार आहेत. (प्रतिनिधी)
नाल्यावरील दुमजली पार्किंग प्लाझा रविवारी होणार खुला
By admin | Published: October 10, 2015 12:04 AM