सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत ६० टक्के अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याची ओरड होत असताना राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्तांसह चार उपायुक्त दिले. यामुळे विविध विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के तर इतर वर्गातील ३० टक्के पदे रिक्त आहेत. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिली जात नसल्याने, शहर अभियंता, बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिका सचिव, विधी अधिकारी, नगररचनाकार, करनिर्धारक संकलक, वैधकीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक यांच्यासह अनेक पदे रिक्त आहेत. मात्र दुसरीकडे आयएएस दर्जाचे आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर तर उपायुक्त पदी अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, गणपतराव जाधव व प्रियांका राजपूत यांची नियुक्ती केली. नव्याने झालेल्या उपयुक्तांच्या नियुक्तीने महापालिका कारभारात पारदर्शकता येऊन स्थानिक मक्तेदारी निर्माण करणाऱ्या व सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हाताचे बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यावर अंकुश राहणार असल्याचे बोलले जाते.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी हे नगरसेवक, स्थानिक नेते, पालिका अधिकारी, पत्रकार यांच्यासह नागरिकां सोबत संवाद ठेवत नसल्याने, त्यांच्या बाबत शहरातून नाराजीचा सूर उमटत आहे. सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी वरिष्ठ व मंत्रालय पर्यंत केल्या आहेत. तर दुसरीकडे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह अन्य उपायुक्त नागरिक, अधिकारी, नगरसेवक आदींना विश्वासात घेऊन काम करीत असल्याने, वर्षोनुवर्षे वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांचे रखडलेले पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांची भरती व इतर कामे मार्गी लागल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच वादग्रस्त व बनावट कागदपत्र देऊन महापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याने, त्यांचे धाबे दणाणले आहे.