-सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : लॉक डाऊन दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने ठेकेदाराची बिले आयुक्तांनी थांबविली आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक कामाला मंजुरी देण्यात आली असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय योजनेकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
उल्हासनगर महापालिकेचे लॉक डाऊन काळात उत्पन्न ठप्प पडल्याने पालिका कारभार शासन अनुदानावर सुरू आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ठेकेदाराची कोट्यवधीचे बिले देणे थांबविले असून अत्यावश्यक कामाला प्राधान्य दिले. एलबीटी पोटी पालिकेला मिळणाऱ्या शासन अनुदानातून पालिका कारभार हाकलला जात आहे. पालिका कर्मचाऱ्याचा पगार, आरोग्य विषयक कामे, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, पावसाळ्याूर्वीचे कामे, साफसफाई आदिवर आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नागरिकांना मालमत्ता कर बिल अदा करण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त विकास चव्हाण यांनी दिली. लॉकडाऊन काळात पालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता कर स्वरुपात उत्पन्न मिळाले होते.
मात्र एप्रिल व मे महिन्यात पालिकेची तिजोरी रिकामी राहणार असल्याचे उपायुक्त चव्हाण म्हणाले. याचा परिणाम शहर विकास कामांवर होणार आहे. गेल्या महिन्यात साडे तीन कोटींच्या निधीतून पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान मोठे ४७ नाले सफाईची कामे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पासून सुरु करण्यात येणार आहे. तर इतर कामाला आयुक्तांनी ब्रेक लावल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाळा तोंडावर आला असताना पावसाळ्यापूर्वीचे कामासह इतर कामाला वेग आला नसल्याने शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी १९ मे पासून घरातच उपोषणाला बसणार असल्याचे पत्र आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले.