अनधिकृत एक्स्चेंजचे सूत्रधार रडारवर, आंतरराष्ट्रीय कॉलसाठी १४ ते १६ पैसे प्रतिमिनिटाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:23 AM2017-10-23T06:23:19+5:302017-10-23T06:24:11+5:30
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत.
जितेंद्र कालेकर
ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत. वसीम हा आंतरराष्ट्रीय कॉलसाठी १४ ते १६ पैसे प्रति मिनिटप्रमाणे कॉलची विक्री करायचा. यातूनच एका गेटवे (सिम बॉक्स मशीन) मधून महिना ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली जायची. अशा २६ मशीन गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने हस्तगत केल्या आहेत.
भिवंडी परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सुरू करून परदेशातून येणारे आंतरराष्टÑीय व्हीओआयपी कॉल हे अनधिकृत सिम बॉक्सच्या साहाय्याने भारतीय कंपनीच्या सिम कार्ड्सचा वापर करून भारतातील इच्छित मोबाइल क्रमांकावर कॉल केले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि संदीप निगडे यांच्या पथकाने १० आॅक्टोबरच्या पहाटे १५ ठिकाणी छापे घालून दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ सिम बॉक्ससह सुमारे २३ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. अटक टोळीची पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, निरीक्षक शीतल राऊत आदी अधिकाºयांनी गेल्या १२ दिवसांमध्ये कसून चौकशी केली.
>मनोजकुमार एटीएसकडून जेरबंद
भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजशी संबंधित असलेल्या मनोजकुमार सैनी याची माहिती अटक आरोपींकडून मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे अधिकारी राजस्थानमध्ये गेले होते. मात्र, तत्पूर्वीच १३ आॅक्टोबरला राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केल्याची माहिती या पथकाला मिळाली. वसीमने नवलगड (राजस्थान) येथे मनोजकुमारकडे सिम बॉक्सची विक्री केली होती. वसीममार्फतच राजस्थान आणि भिवंडीतही हे टेलिफोन एक्स्चेंज चालविले जात होते.
राऊटर कॉलचा उपयोग कोणासाठी?
अधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे आंतरराष्टÑीय फोन केल्यानंतर त्याचा प्रतिमिनिट आठ ते नऊ रुपयेप्रमाणे दर आकारला जातो. भारतातून सौदी अरेबिया, अमेरिका, दुबई या देशांमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त जे लोक गेले आहेत, त्यांना फ्री कॉलिंगच्या नावाखाली अशा राऊटर कॉलचे कार्ड्स महिना ३०० ते ४०० रुपयांना विकले जातात.
>दिवसाला ४ हजार रुपये कमिशन
वसीम आणि त्याची टोळी भिवंडीतील वेगवेगळ्या अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजला गेटवे मशीन्स पुरवीत होते. त्यातून एका कॉलिंगला प्रतिमिनिट १४ ते १६ पैसे असे दिवसाला सुमारे चार हजार रुपये कमिशन त्याला मिळत होते. साधारण, एका सिम बॉक्स मशीनमागे किमान ७० ते ७५ हजार रुपये प्रतिमहिना त्याची कमाई होत होती. अशा २६ मशिन्स आतापर्यंत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. म्हणजे ही कमाई निव्वळ १८ ते २० लाखांमध्ये जात होती. त्यातून आंतरराष्टÑीय कॉल्स प्रथमदर्शनी दिसत नसल्यामुळे केंद्राचा कोट्यवधी रुपयांचा महसूल यातून बुडत होता. शिवाय, खंडणी किंवा देशविघातक कृत्यांसाठीही या राऊटर्सचा (कॉल वळविणे) वापर होत आहे़