ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात येत्या रविवारी १४ जानेवारी रोजी महायुतीचा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडणार आहे.अशी माहिती महायुती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी रात्री उशिरा ठाण्यात महायुतीच्या प्रमुख स्थानिक नेत्यांची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,भाजपाचे महासचिव जयप्रकाश ठाकूर , शहरअध्यक्ष संजय वाघुले माजी खासदार संजीव नाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट )शहर अध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते.
येत्या १४ जानेवारी रोजी ठाण्यातील शिवाजी मैदान पटांगणात महायुतीचा महामेळावा पार पडेल.पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडेल. या मेळाव्यात भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई ( आठवले गट ) यांच्या सह महायुतीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
हा मेळावा आगामी लोकसभा निवडणुकीच्या ठाणे जिल्ह्यातील तयारीची सुरवात असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती दर्शवावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.