भिवंडी : शहरात भुयारी गटाराचा पहिला टप्पा वादाच्या भोव-यात असताना तत्कालीन नगरसेवक आणि बांधकाम विभागातील अधिका-यांनी दुस-या टप्प्यातील कामेही अर्धवट केली आहेत. निधीअभावी रखडलेली ही कामे अमृत योजनेतून करण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत मांडला असता नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे ही योजनाही निधीअभावी रखडण्याच्या मार्गावर आहे.महापालिका क्षेत्रात भुयारी गटार टप्पा क्र. २ च्या कामासाठी जुलै २०१५ मध्ये ४२७.९८ कोटींचे कंत्राट ईगल इन्फ्रा इंडिया यांना दिले होते. मूळ मंजूर योजनेच्या किमतीवर सरकारचे अनुदान मिळणार आहे. अंदाजित रक्कम १७१.९९ कोटी असून भाववाढीसह प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्वसाधारणपणे ५७५.९२ कोटी इतकी रक्कम या प्रकल्पासाठी उपलब्ध करावी लागणार आहे. त्यापैकी सरकारने ४६० कोटी मंजूर केले आहेत. या कामासाठी पालिकेला ३९४.६५ कोटी रक्कम उभी करायची आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असून पालिकेवर ८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे हे काम बंद होण्याच्या मार्गावर आहे.अशा स्थितीत झालेल्या कामाचा त्रयस्थ संस्थेकडून व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक अहवाल घेऊन ही योजना सरकारच्या अमृत योजनेतून राबवल्यास सरकारचा निधी मिळेल व भाववाढीची रक्कम द्यावी लागणार नाही, असा प्रस्ताव आयुक्त योगेश म्हसे यांनी महासभेत मांडला. परंतु, भुयारी गटार योजना टप्पा क्र. १ व २ मध्ये काही नगरसेवकांनी पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व अभियंत्यांना हाताशी धरून आपल्या प्रभागातील कामांसाठी स्वत: कंत्राटदार नेमले आहेत. त्यामुळे आपले पितळ उघड होईल, या भीतीने प्रस्तावास विरोध होत आहे.दरम्यान, शहरात कुठल्याही प्रकारचा विकास केला जात नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने चांगल्या सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे.
निधीअभावी रखडणार भुयारी गटार योजना, भिवंडी पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:51 AM