बेरोजगार मराठी कलाकाराला मिळाला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:52+5:302021-08-17T04:45:52+5:30
ठाणे : कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या ठाणे पूर्व येथील एका मराठी कलाकाराला मनसेने मदतीचा हात देऊन त्यांचा हिरावलेला निवारा परत ...
ठाणे : कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या ठाणे पूर्व येथील एका मराठी कलाकाराला मनसेने मदतीचा हात देऊन त्यांचा हिरावलेला निवारा परत मिळवून दिला. या कलाकाराला मनसेने आर्थिक मदत केली. ही मदत देण्यासाठी मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी ठाण्यात आले होते. या कलाकाराला रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन अंकुश यांनी दिले.
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोट्यामोठ्या भूमिका करणाऱ्या ठाणे पूर्व येथील आनंदनगर येथील मिलिंद चव्हाण यांच्यावर कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड आली. त्यामुळे जवळपास १० महिन्यांचे घरभाडे, वीजबिल थकले. १५ ऑगस्टपर्यंत या कलाकाराला घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले. हा कलाकार आपले घर वाचवण्यासाठी सगळीकडे मदतीसाठी धडपडत होता, पण पदरी निराशा पडत होती. शेवटी त्यांनी मनसे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून मराठीतही सोनू सूद निर्माण व्हावे असे आवाहन केले. रविवारी ही मदत चौधरी यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, विश्वजित जाधव, आशिष डोके, तसेच, चव्हाण यांच्या मातोश्री व बहिणी उपस्थित होत्या. चव्हाण यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे जाधव यांनी सांगितले. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी मनसेशी संपर्क करावा, ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्याचप्रमाणे कलाकार म्हणूनही आम्ही सर्व मदतीसाठी तयार असल्याचे चौधरी म्हणाले. बेरोजगार कलाकारांना आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत, त्यांनी आमच्याशी संपर्क करण्याचे आवाहन खोपकर यांनी यावेळी केले.
-------------
माऊलीला अश्रू अनावर
आपल्या डोक्यावरचे छप्पर जाता जाता वाचल्यामुळे चव्हाण यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. हे पाहून भावुक झालेल्या अंकुश चौधरी यांनी त्यांचे अश्रू पुसले. एवढेच नव्हे तर त्यांचे रक्षण केल्यामुळे अंकुश यांना या माऊलीने राखीदेखील बांधली.
फोटो मेलवर