म्हसा उपकेंद्रात पोलिओचे बेवारस किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:11+5:302021-06-28T04:27:11+5:30
मुरबाड : तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सासणे उपकेंद्र हे पोलिओ लसीकरणाच्या दिवशी बंद असताना तेथे पोलिओ व्हॅक्सिनचे ...
मुरबाड : तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सासणे उपकेंद्र हे पोलिओ लसीकरणाच्या दिवशी बंद असताना तेथे पोलिओ व्हॅक्सिनचे किट बेवारस पडलेले आढळले. यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम रविवारी राबविण्यात आला. मुरबाड तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १ ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणासाठी सासणे गावातील उपकेंद्रावर म्हसा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीचा पुरवठा केला. मात्र त्या केंद्रात डाॅक्टरसह कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे त्याला टाळे होते. या बंद आरोग्य केंद्रात लसीकरणाचे किट बेवारस पडलेले नागरिकांना आढळल्याने खळबळ उडाली. हा प्रकार तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांच्या निदर्शनास आणून दिला असता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. काही वेळातच हे आरोग्य केंद्र उघडले गेले व त्या बेवारस पडलेल्या किटचा ताबा घेण्यात आला.
-----
हे किट बेवारस पडलेले आढळून आले. याला कोण जबाबदार आहे याचा आरोग्य केंद्राकडून अहवाल मागविण्यात येईल व दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी