प्रभाग समिती कार्यालयाबाहेरच प्लास्टिकचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:31 AM2019-07-30T00:31:17+5:302019-07-30T00:31:20+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : प्लास्टिकबंदीचे खुलेआम उल्लंघन, तक्रार करताच थातूरमातूर कारवाई
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर आणि प्रशासन यांचा प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाईचा दावा खोटा ठरला आहे. महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालय परिसरातच सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे नजरेस पडत आहे. प्लास्टिकबंदीचे खुलेआम उल्लंघन होत असताना लोकप्रतिनिधीही मूग गिळून असल्याने यात अर्थपूर्ण मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे.
राज्य शासनाने सर्वच प्लास्टिक पिशव्यांसह स्ट्रॉ, चमचे, थर्माकोल, पॉलीप्रॉपलीन पिशव्या, प्लास्टिक कंटेनर आदींवर बंदी घातली आहे. असे असतानाही मीरा-भार्इंदरमध्ये राजरोस प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर सुरू आहे. याबाबत तक्रार केली असता थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेली जात आहे. महापालिका मुख्यालय परिसरात भरणाऱ्या रविवार बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री सुरू आहे. पालिका प्रवेशद्वाराबाहेरच दुकान थाटणारे फेरीवाले प्लास्टिक पिशव्या ठेवत आहेत. भार्इंदर प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरातहीरोजच प्लास्टिक पिशव्यांचा बेधडक वापर सुरू आहे. महापालिका मुख्यालयाबाहेरच प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याची तक्रार केल्यावर स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह आले. त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा चाललेला वापर पाहिल्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. मात्र, पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड असताना बहुतांश फेरीवाल्यांकडून ५०० ते हजार रुपयेच दंड वसूल करण्यात आला.
जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईच नाही
शहरभर प्लास्टिकबंदीचा फज्जा उडालेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निलंबन सोडाच, साधी कारणे दाखवा नोटीसही बजावली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.