ठाणे : गरोदर आणि स्तनदा मातांची लसीकरण मोहीम जुलैपासून सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ८८ गरोदर व स्तनदा मातांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४९ लाख ६३ हजार ४४८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ३५ लाख ७५ हजार ५७८ नागरिकांना पहिला, तर १३ लाख ८७ हजार ८७० जणांना कोरोनाचा लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात जुलै महिन्यापासून गरोदर आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली. मात्र, त्यास गरोदर महिला आणि स्तनदा मातांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नव्हता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे लवकरात लवकर लसीकरणासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेने काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच समाज माध्यमांमार्फतही कोरोना प्रतिबंधक लसींचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने आता अशा माता पुढे येऊ लागल्या आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ८८ गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एक हजार ४५८ गरोदर मातांचे, तर ६३० स्तनदा मातांचा समावेश आहे.