भिवंडीत खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:35+5:302021-07-24T04:23:35+5:30
भिवंडी : भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटा ते चिंचोटी रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर असलेल्या ...
भिवंडी : भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटा ते चिंचोटी रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे गुरुवारी रात्री एका तरुणाला जीव गमवावा लागला. तेजस अभिमन्यू पाटील (वय २०, रा. वडघर) असे मृताचे नाव आहे. हा तरुण मित्रांसह कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतत असताना अंजूरफाटा, बहात्तर गाळा परिसरात चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील खड्डा चुकवताना गाडी खड्ड्यात आदळून दुचाकी खाली पडून पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली सापडून तेजस याचा जागीच मृत्यू झाला.
महामार्गाची दुरवस्था झाली असून त्याकडे टोलवसुली करणाऱ्या कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्यामुळे टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
दुरुस्तीचे पितळ उघडे
स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून आंदोलने केली हाेती. अखेर, राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रकमेतून तब्बल सात कोटींचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र, ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने बुधवारी व गुरुवारी कोसळलेल्या पावसात रस्ता दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. गटार व्यवस्थापनाचे कोणतेही काम व्यवस्थित केले नसल्याने या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर, माणकोली ते अंजूरफाट्यापर्यंतच्या रस्त्यावर वळपाडा, माणकोली, अंजूरफाटा, बहात्तर गाळा, कालवार, वडघर, खारबाव येथे रस्त्याची वाताहत झाली आहे.