कल्याणमधील भाजप नगरसेवकाची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 09:03 AM2021-01-23T09:03:22+5:302021-01-23T09:04:19+5:30
केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० संपला आहे. सध्या मनपात प्रशासकीय राजवट आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली असून ती मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. एका व्हिडीओवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विक्रम तरे यांनी केला आहे. तर, शिवसेनेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० संपला आहे. सध्या मनपात प्रशासकीय राजवट आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली असून ती मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. इतकेच नाही तर काही तरी मुद्यावर पक्षांमध्ये वादविवाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी व्हायर झालेल्या व्हिडीओमध्ये मनपाचे काही कर्मचारी व व्यापारी यांच्या वाद होताना दिसत आहे. त्या व्हिडीओच्या खाली माजी तरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता. या व्हिडीओमुळे शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे.
तरे म्हणाले की, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. त्यात ब्लॅकमेलिंग व भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. यामध्ये केडीएमसीचे कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी समील आहेत.
दावा दाखल करणार
सेनेच्या युवा पदाधिकाऱ्याने व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप तरे यांनी केला आहे. शिवसेना चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. तरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बदनामीप्रकरणी ते मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.