ठाणे - शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याने पैठणकर आणि त्यांच्या घरातील सदस्यांना हसमुख शहा पिता-पुत्राने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मनसेकडून या प्रकाराची दखल घेण्यात आली आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाडा भागात मराठी कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असताना अशाप्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण होणं हे दुर्दैव आहे. स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हसमुख शहा यांना शोधण्यासाठी गेले असताना त्यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. 5 दिवसांपूर्वी ही घटना घडली तरीही आजतागायत हसमुख शहा याला अटक झाली नाही अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच हसमुख शहा जिथे कुठे भेटेल त्याला मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. मराठी माणसाने शांत बसू नका, ठाण्यात जे उदाहरण घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकेल. आम्ही मतांसाठी लाचार नाही. मराठी माणसांवर कोणी हात उचलेल तर ते सहन करणार नाही. अशी घटना पुन्हा घडण्यापूर्वी यांना वेळीच ठेचणार असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान हसमुख शहा याला घर विकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. संपूर्ण मनसे पक्ष पैठणकर कुटुंबाच्या पाठिशी आहे. अशाप्रकारे अन्य कोणत्या भागात घडत असेल तर कोणतीही भीती न बाळगता मनसेशी संपर्क साधावा असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.
सुयश सोसायटीतील पैठणकर यांना याच इमारतीत राहणाऱ्या हसमुख यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ११ सप्टेंबरला घडली. याप्रकरणी राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकत्याच तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो ठाण्यात चर्चेचा विषय ठरला असून त्यात मराठीविरुद्ध गुजराती असा रंग दिल्याने चीड व्यक्त होत आहे.