खासदार, आमदारांना ग्रामस्थांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:49 AM2019-09-16T00:49:33+5:302019-09-16T00:58:08+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या बेतात असताना आचारसंहितेपूर्वी शिवसेना-भाजपकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका केडीएमसी हद्दीत सुरू आहे.

The villagers should ask MPs, MLAs | खासदार, आमदारांना ग्रामस्थांनी विचारला जाब

खासदार, आमदारांना ग्रामस्थांनी विचारला जाब

Next

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या बेतात असताना आचारसंहितेपूर्वी शिवसेना-भाजपकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका केडीएमसी हद्दीत सुरू आहे. रविवारी सागाव येथे रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भोपर गावच्या ग्रामस्थांनी गावात पाणी येत नसल्याच्या कारणावरून आमदार, खासदारांना जाब विचारला. तसेच, न्यायालयीन स्थगिती आदेश असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरूनही विरोध झाला.
युनियन बँक ते रविकिरण सोसायटी या रस्त्याच्या भूमिपूजनाला सायंकाळी ५ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आले होते. त्यांच्यासोबत आ. सुभाष भोईर व शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे होते. हा रस्ता खाजगी जागेतून जात असून हिरामण म्हात्रे यांनी कल्याण दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्याने त्यावर स्थगिती आहे. न्यायालयाचे आदेश असताना या जागेतून रस्त्याचे काम कसे काय करता, असा सवाल हिरामण यांचा मुलगा जयेश म्हात्रे यांनी करीत हरकत घेतली. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. हा रस्ता आमदार भोईर यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. हा वाद सुरू असताना त्याठिकाणी भोपर गावातील ग्रामस्थ पोहचले. त्यांनी भोपर गावातील पाणीसमस्या कधी सोडविणार, असा जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांनी आमदारांच्या विरोधात आमदारांसमोरच खासदारांच्या उपस्थितीत नाराजी व्यक्त केली. त्याठिकाणची परिस्थिती पाहता खासदार, आमदार तेथून निघून गेले.
काही दिवसांपूर्वीच वेदपाठशाळा व वृद्धाश्रम च्या कार्यक्रमावरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मनसे व शिवसेनेने पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार आणि आमदारांना ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येप्रकरणी जाब विचारला. तसेच ज्या रस्त्याचे भूमिपूजन आहे, त्या रस्त्याप्रकरणी न्यायालयीन स्थगिती आदेश आहे. यावरून शिवसेना-भाजपच्या विकासकामांची भूमिपूजने वादात सापडत असताना दिसून येत आहेत.
>लवकरच बैठक घेऊ - शिंदे
रस्त्याच्या जागेसंदर्भात जो विषय आहे त्यासंदर्भात बैठक घेऊन संबंधितांना मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे खासदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पण त्यांनी पाणी विषयावर भाष्य केले नाही.

Web Title: The villagers should ask MPs, MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.