वाहतूकीचे नियम भंग: वर्षभरात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केली २२ कोटींची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:55 PM2020-11-19T23:55:20+5:302020-11-19T23:58:26+5:30
यापुढे एखाद्याने वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर ई चलनाच्या दंडाची रक्कम अथवा थकीत दंडाची रक्कम दहा दिवसांमध्ये न भरल्यास संबंधित वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. एका विशेष मोहिमेद्वारे सुरुवातीला पाच हजारांपेक्षा अधिक दंडाची थकबाकी असणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूकीचे नियम तोडणा-या चालकांविरुद्द जानेवारी ते १८ नाव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. यातील अनेकांनी हा दंड भरलेला नाही. यापुढे थकीत दंड दहा दिवसांमध्ये न भरल्यास संबंधित वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ उपविभागांमार्फतीने १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रक्रीया सुरु केली आहे. वाहतूकीचे नियम तोडणाºया दररोज सुमारे अडीच हजार वाहन चालकांविरुद्ध ३०० ई चलान डिव्हाईसच्या मार्फतीने ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथे विशेष मोहिमेंतर्गत कारवाई केली जाते. रस्ते अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतूकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तरीही वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम तोडणाºया वाहन चालक आणि मालकांकडून ई चलनाद्वारे केलेल्या कारवाईची तडजोड रक्कम वसूल होणेही आवश्यक आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमेंतर्गत यापुढे कारवाईचा दंड थकविणाऱ्यांविरुद्ध नाकाबंदीद्वारे वाहनांचे चलान तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे दंड भरणे प्रलंबित आहे, त्यांनी येत्या दहा दिवसात तो भरणा करावा. तो भरणा न केल्यास १ डिसेंबर नंतर मात्र असे वाहन आढळून आल्यास मोटर वाहन कायदा कलम २०७ अन्वये हे वाहन ताब्यात घेतले जाणार आहे. त्याचबरोबर वाहन परवाना निलंबनाबाबतही प्रक्रीया सुरु केली जाणार आहे.
* महाराष्टÑात कुठेही भरता येणार दंडाची रक्कम
एखाद्याने ठाण्यात वाहतूकीचा नियम तोडला असेल तर संबंधित वाहन चालक हा मुंबईत किंवा महाराष्टÑात कुठेही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे ई चलनाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्र्डद्वारे भरणा करु शकतो.
* महाराष्टÑ शासनाच्या वेबसाईटवर जाऊनही वाहन क्रमांक, चलान क्रमांक नमुद करुन आपल्या वाहनावरील प्रलंबित तडजोड शुल्क चलान क्रमांकाची निवड करुन भरता येणार आहे.
* पेटीएमद्वारेही चलान भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच महाराष्ट्र अॅप, मुम ट्रॅफिक अॅप मध्ये माय व्हेईकल या टॅबवर क्लिक करुन आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करावे. नंतर माय ई चलान मध्ये किती रक्कम प्रलंबित आहे, हे दिसते. त्या चलानवर क्लिक केल्यावर ही रक्कम भरता येणार आहे.
* १४ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ या ११ महिन्यांमध्ये सहा लाख ३० हजार २३२ चलानद्वारे २१ कोटी १४ लाखांची दंडात्मक कारवाई झाली. तर १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२० या काळात पाच लाख ५२ हजार ४५३ चलानद्वारे २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. यातील थकबाकीदारांवर आता कारवाई केली जाणार आहे.
* सुरुवातीला पाच हजारांपेक्षा जास्त दंडाची रक्कम थकीत असणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचेही पोलीस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.