मतदान करा आणि मोफत चहाचा आस्वाद घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:15 AM2019-04-29T00:15:37+5:302019-04-29T06:21:19+5:30
भाईंदरमध्ये मराठी तरुणाची ऑफर : मतदानवाढीकरिता लोकांचा उत्स्फूर्त प्रयत्न
मीरा रोड : मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता भाईंदरच्या एका मराठी तरु णाने त्याची खासियत असलेला चहा सोमवारी बोटाला शाई लागलेली पाहून मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. भाईंदर पश्चिमेला एका मॉलसमोर शिवकुमार काळे या मराठी तरु णाचे चहाचे दुकान आहे. तंदुरी आदी चहाचे विविध प्रकार त्याची खासियत आहे. गेल्या दीड वर्षापासून तो चहाची विक्री करत आहे. जागतिक महिला दिवस, बाल दिन अशा महत्त्वाच्या दिवशी तो महिला, बालकांना मोफत चहा देत असतो. लोकसभा निवडणुकीकरिता उद्या सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मोफत चहा देण्याची योजना त्याने जाहीर केली आहे.
मतदारांनी जास्तीतजास्त मतदान करावे तसेच जे मतदार मतदान करून आले आहेत, त्यांचे आभार मानून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवकुमार यांनी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत चहा देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘मतदारांनो मतदान करा’, असे आवाहन करणारे फलक त्यांनी लावले आहेत. मतदान केल्यानंतर बोटाला लागलेली शाई दाखवल्यावर मोफत चहा दिला जाणार आहे, असे शिवकुमार म्हणाले. कमीतकमी पाच हजार मतदारांना मोफत चहा पाजण्याची त्यांनी तयार आहे. त्यापेक्षा जास्त मतदार आले तरीही त्यांना चहा देऊ, असे त्यांनी सांगितले.
मतदारांना १५ टक्के सवलत
मीरा रोडच्या सिल्व्हर पार्कजवळील एका हॉटेलच्या मालकाने मतदान केलेल्यांना बिलात १५ टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.