ठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू असताना ऐन मतदानाच्या दिवशी सुटी आणि त्याआधी दोन दिवस, पुढे एक दिवसाची रजा टाकली की, सलग पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. या पाच दिवसांचे गणित आखून अनेकांनी पिकनिकला जाण्याचे, तर चाकरमान्यांनी गावाला जाण्याचे प्लॅन आखले आहेत. ठाण्यातून महाराष्टÑभर जाणाऱ्या एसटीचे बुकिंग आजच्या तारखेला ४० टक्के फुल्ल झाले असून येत्या आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाणार आहे. त्यामुळे मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आतापासूनच विविध पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
ठाणे मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून चार हजार बॅनर, पोस्टर, जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू असून लोकशाहीचा अधिकार बजावावा, असे आवाहनही केले जात आहे. विविध पक्षांकडूनसुद्धा मतदारांना प्रलोभने दाखवून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत आहे. परंतु, मतदानाची जी तारीख दिली आहे, त्यामुळे मोठा घोळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. २९ एप्रिलला मतदानासाठी सुटी असणार आहे. त्याआधी २७ एप्रिल हा चौथा शनिवार आणि त्यानंतर लागलीच रविवार अशा या दोन सुट्या होत आहेत. त्यानंतर, मतदानाची तिसरी सुटी आणि पुन्हा एक दिवस रजा टाकली, तर १ मे ची सुद्धा चाकरमान्यांना सुटी मिळत आहे. पाच दिवसांत केवळ एकच दिवस रजा टाकावी लागत असल्याने अनेकांनी त्यादृष्टीने प्लानिंग सुरू केले आहे. काहींनी पिकनिकला जाण्याचा, तर काहींनी थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्यासाठी आता विविध पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सीबीएसई सोडले, तर इतर शाळांना १० एप्रिलनंतर सुट्या लागणार आहेत.सीबीएसई शाळांना १ मेपासून सुटी आहे. तेथील पालकांनीही सुट्यांचे नियोजन आखले आहे. त्यामुळे १० एप्रिलनंतरचे एसटीचे बुकिंग ४० टक्के फुल्ल झाले आहे. आठ दिवसांत ते १०० टक्कयांवर जाऊ शकते. यामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा नंबर पहिला असून, त्याखालोखाल मराठवाडा आणि खान्देशच्या चाकरमान्यांचा नंबर आहे. आठ दिवसांत २६ एप्रिलपासूनचे बुकिंग फुल्ल होणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी होणार आहे.