पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:24 AM2019-09-16T00:24:30+5:302019-09-16T00:24:35+5:30

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे.

Wake up to administration after victim of police personnel | पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग

पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग

Next

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. मात्र अंबरनाथमध्ये ज्या चौकात खड्डे होते त्याच चौकात बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाचाच खड्डयामुळे जीव गेला. वाहतूक पोलिसाचा खड्ड्यामुळे जीव गेल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.ज्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते त्या रस्त्यावर आता सातत्याने दुरुस्तीची कामे सुरु आहे. मात्र असे असले तरी खड्डयामुळे होणारा त्रास मात्र अजूनही कायम आहे. तर ज्या खड्डयामुळे पोलिसाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयाचा आधार हरपला आहे. वाहतूक पोलीस म्हणून काम करणारे संजीव पाटील हे डीएमसी चौकातून जात असताना रस्त्यावरील खड्डयामुळे त्यांच्या गाडीचा तोल गेला. खड्डयामुळे ते आपल्या दुचाकीसह खाली पडले. याचवेळी मागून येणाºया ट्रकने त्यांना चिरडले. वाहतूक नियंत्रित करत असतांनाच त्यांना अपघाताचा सामना करावा लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या चौकात अपघात झाला त्याच चौकात अनेक ठिकाणी रस्ता खड्डयात गेला आहे. पेव्हर ब्लॉकही निघाल्याने त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि मोबाइलच्या वाहिन्या टाकण्यासाठी पेव्हरब्लॉक काढण्यात आले होते. मात्र या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणि पेव्हरब्लॉक यांच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्डयामुळे एखाद्याचा जीव जाणार अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र या खड्डयाचा सर्वात मोठा फटका हा याच चौकात पोलिसांनाच बसला आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयात तोल गेल्याने पाटील यांना मागून येणाºया ट्रकने उडविले. हा सर्व प्रकार भर चौकात इतर वाहतूक पोलिसांच्या समोरच घडला. पाटील यांचा मृत्यू हा अपघाती असला तरी या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएच जबाबदार असल्याची ओरड झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरु करण्यासाठी मार्च महिन्यातच आदेश दिलेले असतांनाही त्याचे काम ठेकेदाराने वेळेत सुरु केले नाही. ठेकेदार आणि एमएमआरडीएचे अधिकारी सातत्याने या कामासाठी विलंब करत राहिले. आधी आचारसंहिता, नंतर वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यावर पावसाळा सुरु झाल्याने पावसात वाहतूक विभागाने रस्ते खोदण्यास हरकत घेतली. या सर्व कारणांमुळे ठेकेदारालाही या ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे काम करता आलेले नाही. काम करणे शक्य नसतांना किमान खड्डे भरण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र ते खड्डेही भरण्यात आलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएकडे बोट दाखवत आहे तर एमएमआरडीए सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी ठरवत आहेत. सरकारी अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा फटका एका वाहतूक पोलीस कर्मचाºयाला सहन करावा लागला. आज एका कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. सरकारी स्तरावर त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस मदत हाती आलेली नाही. मदत कितीही आली तरी आपल्या घरचा आधार पुन्हा येणार नाही याची जाणीव पाटील कुटुंबीयांना झाली आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत मदतीसाठी प्रस्तावही गेला आहे. आज ना उद्या मदत मिळेल देखील, मात्र कुटुंबातील आपला हक्काचा माणूस नसेल याचे शल्य कायम राहणार आहे.

Web Title: Wake up to administration after victim of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.