वॉल दुरस्त, पाणी पुरवठा सुरळीत; उल्हासनगर पुर्वेला पाणी टंचाई, नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:11 PM2020-10-14T18:11:17+5:302020-10-14T18:11:27+5:30
उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : गेल्या एका आठवड्यापासून अनियमित होत असलेल्या पाणी पुरावाठयाच्या निषेधार्थ मराठा सेक्शन येथील शेकडो नागरिक आज रस्त्यावर आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका वठवून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी यांना फोन करून पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढला.
उल्हासनगर पूर्वेत गेल्या आठवड्यापासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला होता. मराठा सेक्शन जिजा माता गार्डन परिसरातील शेकडो नागरिक बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान कोयांडे पुतळ्या जवळ एकत्र येवुन महापालिका विरोधात घोषणाबाजी करू लागले. सदर प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांना समजल्यावर, पोलिस अधिकारी यांनी कोरोना महामारी याची आठवण करून देवून नागरिकांना शांत केले. त्यापैकी काही जणांना पोलिस ठाण्यात घेवून जावून महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी जी सोनावणे यांच्या सोबत संपर्क साधला. सोनावणे यांनी त्वरित पाणी टँकरची व्यवस्था करून जलवाहिनी वरील वॉलचे काम झाल्याने रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन पोलिसांसह नागरिकांना दिले.
शहर पूर्वेला पाणी पुरवठा करण्यात येत आलेल्या मुख्य जलवाहिनी वरील दोन पाणी वॉल खराब झाले. पहिल्या वॉलची दुरस्ती केल्यानंतर दुसऱ्या वॉलच्या दुरस्तीचे काम सुरू केले. दरम्यान उच्च दाबाने पाणी पुरवठा झाल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहर पूर्वेतील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनावणे यांनी दिली. जलवाहिनी दुरस्तीचे काम पूर्ण झाले असून रात्री पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली. तो पर्यंत मराठा सेक्शन जिजामाता गार्डन येथील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे. ऐण कोरोना काळात पाणी टंचाई निर्माण झाला असून महापालिकेने वेळीच याची दखल घेतली नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे माहिती मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिली आहे.
पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण गेल्या आठवड्यपासून शहर पूर्व मध्ये पाणी टंचाई निर्माण होऊन, महिला पाण्याच्या एका हंड्या साठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली. अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिली. पाणी पुरवठा विभाग अध्यावत करण्याची गरज असून पाणी टंचाई अशीच काय राहिल्यास आंदोलनास करण्याचा इशारा गंगोत्री यांनी महापालिकेला दिला आहे