दोन कंपन्यांसह गोदामालाही भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:45 AM2021-01-23T08:45:15+5:302021-01-23T08:46:22+5:30
बायोसेन्स कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यापाठोपाठ स्पॅन डायग्नोस्टीक आणि प्रशांत कॉर्नर या मिष्टान्न निर्मितीच्या गोदामालाही आगीची झळ बसली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.
ठाणे : वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, रोड क्रमांक ३१ येथील बायोसेन्स ए तुलिप डायग्नोस्टिक तसेच स्पॅन डायग्नोस्टीक या दोन कंपन्यांसह एका मिठाईच्या गोदामालाही शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
बायोसेन्स कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यापाठोपाठ स्पॅन डायग्नोस्टीक आणि प्रशांत कॉर्नर या मिष्टान्न निर्मितीच्या गोदामालाही आगीची झळ बसली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच ठाणेअग्निशमन दलाच्या जवानांनी आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांनी सायंकाळी ७ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
घटनास्थळी वागळे इस्टेट, पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी चार फायर इंजिन, चार वॉटर टँकर, चार जंम्बो वॉटर टँकर आणि दोन रेस्क्यू वाहनांच्या मदतीने मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, उपअधिकारी समाधान देवरे तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संतोष कदम यांच्या पथकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली. आगीचे नेमकी कारण समजू शकले नसून वागळे इस्टेट पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.