घोडबंदरच्या २०६ प्रकल्पांना पाच वर्षात पाणी कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:12 AM2017-09-27T04:12:39+5:302017-09-27T04:12:42+5:30
पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश दिल्यानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षात या भागात किती बांधकामांना ओसी दिली
ठाणे : पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश दिल्यानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षात या भागात किती बांधकामांना ओसी दिली आणि किती बांधकामांना पाणी कनेक्शन दिले याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने मागील पाच वर्षात येथे २०९ प्रकल्पांना ओसी दिली असून त्यातील २०६ प्रकल्पांना १४७८ पाण्याचे कनेक्शन दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, न्यायालयाने अद्यापही जैसे थे आदेश कायमच ठेवले आहेत. त्यामुळे स्थगिती केव्हा उठणार या प्रतिक्षेत विकासक वाट पाहत आहेत. दुसरीकडे या भागात सुरू असलेल्या नव्या तब्बल २८५ इमारतींना याचा फटका बसला आहे.
जुने ठाणे अपुरे पडू लागल्याने नवे ठाणे अर्थात घोडबंदरकडे पाहिले जात आहे. मागील सात ते आठ वर्षात या भागाचा विकास झपाट्याने झाला आहे. रस्ता रुंदीकरण झाल्याने या भागात बड्या बिल्डरांनी घुसखोरीस सुरुवात केली. या परिसरात अनेक इमारती उभ्या असल्या असल्यातरी त्याठिकाणचे भाव अधिक असल्याने बहुसंख्य इमारतीमधील विक्री अभावी फ्लॅट रिमामेच आहेत. यामुळे त्यांच्या विक्रीसाठी विकासकांनी ग्राहकांना विविध योजनांचे आमिष दाखवले आहे. आजही येथील नव्याने तयार झालेल्या इमारतींमधील ४० टक्के फलॅट रिकामे आहेत.
दरम्यान आता न्यायालयाने पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ९ जूनपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये असे निर्देश पालिकेला दिले होते. हे स्थगिती आदेश उठविलेले नाहीत. दुसरीकडे ओसीदेखील न देण्याचे न्यायालयाचे निर्देश असल्याने त्याचा फटका आता या भागात सुरू असलेल्या २८५ इमारतींच्या बांधकामांना बसला आहे. या बांधकामांना न्यायालयाचे पुढील निर्देश येत नाही तो पर्यंत ओसी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच या इमारतींना ओसी नाही म्हणून पाणीपुरवठा देखील न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळेच आता या इमारती उभ्या असल्या तरी पाणी नसल्याने त्यातील फ्लॅटच्या बुकिंगवर परिणाम झाला आहे.
९१ दशलक्ष ली.च्या जागी ८८ दशलक्ष ली.चा पुरवठा
मागील पाच वर्षात घोडबंदर भागात किती प्रकल्पांना ओसी दिली आणि किती बांधकामांना पाणी कनेक्शन दिले. याची माहिती न्यायालयाने मागीतली होती. त्यानुसार या भागात मागील पाच वर्षात २०९ प्रकल्पांना ओसी दिली असून यातील २०६ प्रकल्पांना पाणी कनेक्शन दिल्याची माहिती पालिकेने न्यायालयापुढे सादर केली आहे.
शिवाय नव्याने इमारती उभ्या राहत असल्या तरी येथील पाच लाख लोकसंख्येला पुरेल एवढा पुरेसा पाणीपुरवठा या घोडबंदर भागाला होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आजघडीला या भागाता ९१ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असतांना येथे ८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.
तसेच या भागातील पाणी योजना आणखी सक्षम करण्यासाठी रिमॉडेलींगची योजना आणून तिचे कामही युद्ध पातळीवर सुरू केल्याचे पालिकेने यापूर्वीच न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे भविष्यात या भागाला पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, न्यायालयाने अद्यापही स्थगिती आदेश न उठल्याने येथील २८५ इमारतींच्या बांधकामांना मात्र फटका बसला आहे.