आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:56 AM2019-04-30T00:56:44+5:302019-04-30T00:56:59+5:30

संतापाची लाट : प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्रेक होण्याची शक्यता

Water from four to eight days for Asangaon residents | आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

Next

आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा आता चार ते आठ दिवसांनी होतो आहे. त्यामुळ आसनगावच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आली आहे. विशेषत: महिलांमध्ये संताप असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव इंडस्ट्रिअल झोन असल्याने अनेक कंपन्या येथे आहेत. तसेच या परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी केली जात आहेत. आसनगाव हे रेल्वेस्थानक मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी देण्यास आसनगावचे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसते आहे.

आसनगाव शहरात सावरोली-आसनगाव, तासपाडा, आणि निर्मलनगर, कोंडेपाडा या तीन पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जातो. यात सावरोली-आसनगाव ही १० इंच व्यासाची, सहा लाख ९० हजार क्षमतेची फिल्टर पाणीपुरवठा योजना असून यातून गावपट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरीवाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन व्ह्यू पार्क बिल्डिंग, विहिरीचापाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणेपाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळसपाडा, शिवाजीनगर, मुंढेवाडी, साई मंदिर, आदर्शनगर येथे पाणीपुरवठा केला जातो. तासपाडा ही तीन इंच व्यासाची, ६० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून तासपाडा, शिऱ्याचापाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर, कोंडेपाडा ही तीन इंच व्यासाची, ४० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज येथे चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनियमित पाणीपुरवठ्याने महिला संतप्त आहेत.

पाणीपुरवठा योजना २५ वर्षांपूर्वीची
उपलब्ध पाणीपुरवठा योजना या २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार १०४ लोकसंख्येसाठी ठीक होत्या, परंतु आताची लोकसंख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त असल्याने, तसेच देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने, २५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. इतरही पाणीपुरवठा योजना दहा वर्षे जुन्या झाल्याने सततची दुरु स्ती, मध्येच वीजपुरवठा कमीजास्त होणे, मोटारी जळणे, नदीतील पाण्याची पातळी कमी होणे आदी कारणांमुळे पाण्याची समस्या भेडसावते आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठवली आहे. या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. - जालिंदर तळपाडे (सरपंच ग्रामपंचायत आसनगाव)

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २१ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन काही निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून समस्यामुक्त होण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. - बी.बी. पाटील, (ग्रामविकास अधिकारी)

Web Title: Water from four to eight days for Asangaon residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.