ठाणे- ठाणे महापालिकेच्या पंपिंग स्टेशन येथे पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्याने गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटांची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. मात्र यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याचदरम्यान पाण्याची टाकी पडल्याची अफवाही पसरली होती.
घोडबंदर रोड, डोंगरीपाडा, सर्व्हिस रोड येथील एचडीएफसी बँक येथे टीएमसीचे पंपिंग स्टेशन आहे. त्या ठिकाणी पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटाची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची तक्रार ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याची समजले.
याचदरम्यान पाणी टाकी फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र घटनास्थळी पाहणी केल्यावर पंपिंग स्टेशन येथे पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्याचे निदर्शनास आल्याचे आपत्ती कक्षेने सांगितले.