सदानंद नाईक, उल्हासनगर : देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त महापालिका प्रभाग समिती कार्यालयातून आलेल्या अमृत कलशाचे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. आणलेल्या प्रभाग समितीच्या कलशातील काही माती एका कलशात टाकून तो कलश आझाद मैदान येथे जमा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरोघरी जावून मूठभर माती आणि तांदूळ अमृत कलशात जमा केली. प्रभाग समिती कार्यालयातील अमृत कलश नृत्य, लेझीमच्या तालात महापालिका मुख्यालयात आणण्यात आले. प्रभाग समिती कार्यकायातून आणलेल्या प्रत्येक कलशातील काही माती एका कलशात आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते टाकण्यात आली. महापालिका प्रभाग समिती कार्यालया मार्फत जमा केलेल माती व तांदूळ भरलेले कलश २७ ऑक्टोबर २०२३ रोजी आझाद मैदान येथे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर सदरचे कलश दिल्लीला नेण्यात येतील व त्यांचा वापर येथे मोठे उद्यानासाठी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईवाडे, प्रियंका राजपूत, सहायक संचालक नगररचना ललीत खोब्रागडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, शिक्षण विभागाचे लेखा अधिकारी निलम कदम, सिस्टम अॅनलिस्ट श्रध्दा बाविस्कर, उद्यान अधिक्षक दिप्ती पवार, भांडार अधिकारी अंकुश कदम, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, मालमत्ता व्यवस्थापक अलका पवार, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महापालिका शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.