काय सांगता, २५ किमीच्या ठाणे मेट्रोवर २२ स्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:25 AM2018-11-11T05:25:11+5:302018-11-11T05:25:47+5:30
लवकरच सल्लागाराची नेमणूक : दीड हजार कोटींचा खर्च, महासभेसमोर प्रस्ताव
ठाणे : मुंबई-ठाणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता अंतर्गत भागातही मेट्रोच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. यासाठी ती राज्य शासन, केंद्र शासनाच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेणार आहे. या कामासाठी सुमारे १५०० कोटींचा खर्च अपेक्षित असून या २५ किमीच्या या मार्गावर २२ स्थानके असणार आहेत. त्यानुसार, तो सोयीस्कर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा, या उद्देशाने ठाणे महापालिकेने त्यासाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.
अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वेस्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यासह संपूर्ण शहरास फायदेशीर ठरेल, अशी मार्गिका निश्चित केली आहे. या मार्गिकेत २२ स्थानके असणार आहेत.
केंद्राच्या मंजुरीनंतरच कामाला सुरुवात
या मार्गाला चालना देण्यासाठी आता पालिकेने यासाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली आहे. या सल्लागाराकडून या मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यानंतर, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणार
पूर्वी ज्या पद्धतीने रिंग रूटचा मार्ग तयार केला होता, तसाच हा मार्ग असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गात असलेली सुमारे एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणार आहेत. सुरुवातीच्या स्थानकापासून ३० मीटर खाली म्हणजेच सिडको ते नवीन रेल्वेस्टेशनपर्यंतचा या मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे. त्यापुढील मार्ग हा रस्त्याच्या वरून असणार आहे. ठाणे स्टेशनपासून ही मेट्रो बाहेर पडणार आहे.
जर्मन बँकेचे कर्ज घेणार
अंतर्गत मेट्रोसाठी सुमारे १५०० कोटींचा खर्च पालिकेने अपेक्षित धरला आहे. या खर्चासाठी राज्य शासन, केंद्र शासनाकडेदेखील निधी मागितला जाणार आहे. तसेच जर्मन बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी जर्मन बँकेचे प्रतिनिधी पालिकेत येऊन गेले असून त्यांनी या मार्गाची पाहणी केली असून हा मार्ग किफायतशीर आहे किंवा नाही, याची चाचपणी केली आहे.