- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात अनेक जण इच्छुक असतानाही शिवसेनेने शहराबाहेरील अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या वागळे इस्टेट येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेत त्या हजर नव्हत्या. या सभेत ठाणे जिल्ह्यातील १८ जागा महायुती जिकेंल, असा दावा ठाकरे यांनी केला. तसेच मुंब्रा-कळव्याची जागाही शिवसेनाच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, ठाण्यातील हीच जागा वगळता इतर तीन जागा शिवसेनेच्या दृष्टीने तशा सोप्या मानल्या जात आहेत. असे असतानाही मुंब्य्रात किंवा कळव्यात सभा का घेतली नाही, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. ना शिवसेनेचे पदाधिकारी या मतदारसंघात फिरकत आहेत, ना वरिष्ठ मंडळी, त्यामुळे प्रचार कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, असा पेच सध्या एकाकी पडलेल्या सय्यद यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांवर भगवा फडकविण्याची गर्जना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सभेत केली. यात त्यांनी मुंब्रा-कळवा विधानसभेच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. पण, गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल का, असा संशय शिवसैनिकांसह इतर पक्षांच्या मतदारांच्या मनात उभा राहिला आहे. कारण, शिवसेनेने या ठिकाणी उभ्या केलेल्या मराठी तारका दीपाली सय्यद यांच्या प्रचारार्थ पक्षाचा कोणताही मोठा नेता मतदारांच्या नजरेस पडला नाही.
सेनेसाठी आव्हान असलेली ही जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांची एखादी सभा, रोड शो कुणाला घ्यावासा वाटला नाही. उलट, ज्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा विजय विक्रमी मतांनी होण्याची शाश्वती असतानाही पक्षाच्या नेत्यांनी तेथेच ठाकरे यांची सभा घेतली.मुंब्रा-कळवा मतदारसंघात बºयापैकी विकासकामे झाली आहेत. आव्हाडांची भक्कम स्थिती असतानाही सेनेने येथे आयात उमेदवार का द्यावा, याचे कोडे मतदारांना पडले नसेल तर नवल. कारण, अहमदनगरच्या दीपाली यांचा या मतदारसंघाशी तसा काहीच संबंध नाही.२००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेने सुभाष भोईर यांना निवडून आणले होते. ते मुंब्रा निवासी असताना आणि अनेक वर्षांपासून त्यांचे कार्यक्षेत्र मुंब्रा असतानाही बाहेरून उमेदवार आणून आव्हाडांचे पारडे अप्रत्यक्षपणे जड करण्यास मदतच केल्याची चर्चा आहे.
दीपाली प्रचारात तेवढ्या सक्रीय नसून, उद्धव ठाकरे यांच्या सभेतही त्या नव्हत्या. येथे लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि संजय केळकर यांची नावे होती. दीपाली यांना बॅनरवरही जागा मिळाली नाही. त्यामुळे दीपाली आणि शिवसेनेचं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.