बदलापूर : मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे हे कल्याण किंवा भिवंडी या दोन्हीपैकी एका मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आमदार किसन कथोरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण केवळ मुरबाड विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा या दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगला संपर्क असल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आज कथोरे यांनी पत्रकार परिषद घेत भिवंडी काय किंवा कल्याण काय या दोन्ही मतदारसंघात आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले.
गेल्या वीस वर्षापासून आपल्याला आमदार म्हणून आपल्या मतदारांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे विकासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यातच आपण धन्यता मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटनेवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता कधी इच्छुक असल्याची बाब पुढे करीत नाही. पक्ष जो निर्णय देतो तो मान्य करून अखंडितपणे आणि अविरतपणे काम करण्याचे प्रयत्न करीत असतो.
आपण देखील पक्ष संघटनेसाठीच समर्पित असून आपल्याला लोकसभा निवडणुकीत रस नसल्याचे स्पष्ट केले. मुरबाड मतदार संघामध्ये विकासाच्या माध्यमातून जो बदल करण्यात आला आहे तो बदल कायम ठेवण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राखण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्याभरापासून मी कामानिमित्त परराज्यात असताना मुद्दाम काही खोट्या बातम्या पेरल्या गेल्याची बाब आपल्या निदर्शनास आली आहे. आपल्याविषयी दुसऱ्या पक्षांमध्ये काय चर्चा चालली आहे, याच्याशी मला देणे घेणे नसून मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे,एवढेच मला कळतं अशीच ठाम भूमिका कथोरे यांनी व्यक्त केली.
आमदार आणि खासदार यांच्यातील वादाबाबत विचारणा केली असता या सर्व प्रकरणाची माहिती आपण वरिष्ठांना दिली असून वरिष्ठ त्या संदर्भात निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर नागरिकांची कामे करण्यावर भर देत आहोत. 'माणसांना कापतो' अशा आशयाचे जे व्हिडिओ व्हायरल केले आहेत ती आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी होते. मात्र सुज्ञ नागरिकांना आपल्या स्वभावाचे आणि कामाच्या शैलीची जाण आहे