सुरेश लोखंडेठाणे : राज्य सरकारने रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑडिट त्वरित करण्याची सक्ती राज्यातील यंत्रणांवर केली आहे. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट अद्याप झालेले नाही. आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या जबाबदारी निश्चितीच्या फायलीत या ऑडिटचे काम रखडल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
भंडारा येथील सिव्हिल रुग्णालयास लागलेल्या आगीत नवजात बालकांचे मृत्यू झाले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, जिल्ह्यातील या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑडिट अद्यापही झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या ऑडिटची शहानिशी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोग्य विभागाने बांधकाम विभागाकडे या कामाची जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले. आता बांधकाम विभाग या ऑडिटचे काम हाती घेणार की आणखी काही या दोन विभागांच्या पत्रव्यवहारात ते अडकणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील नागरिकांना जिल्हा परिषदेची ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य पथकांकडून होणाऱ्या वैद्यकीय उपचारावरच अवलंबून राहावे लागत आहे. बाळ, बाळंतीणीसाठी वरदान ठरणाऱ्या या आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीबेरात्री डॉक्टरांचा अभाव असतो. त्यामुळे बहुतांशी महिलांना शहराकडे येताना रस्त्यातच बाळ गमावल्याच्या घटनांना तोंड द्यावे लागल्याचे उदाहरणे आजही अंगावर शहारे आणतात. त्यामुळे आराेग्य यंत्रणेच्या सुरक्षेविषयीच प्रश्न उभे राहत आहेत.
फायर व इलेक्ट्रिक ऑडिटविषयी आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता त्यांनी बांधकाम विभागाकडे ऑडिट करण्याची जबाबदारी दिली आहे. बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्या ऑडिटचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून ते पूर्ण करण्यात येणार आहे. - भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
आरोग्य अधिकाऱ्यांचे मौनभंडारा रुग्णालयातील दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने फायर व इलेक्ट्रिक ऑडिट त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत; पण मुंबईशेजारच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या या ३३ आरोग्य केंद्रांमध्ये मात्र अजूनही ते काम हाती घेतलेले नसल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मनीष रेघे व संबंधित विभागाचे लिपिक अमर तायडे यांच्याशी सतत संपर्क साधूनही त्यांनी त्याविषयी मौन बाळगले आहे.