विकासकामांवरील २० हजार कोटी गेले कुठे?- राजू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:52 AM2020-06-25T00:52:46+5:302020-06-25T07:09:45+5:30
२० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
कल्याण : केडीएमसीत १९९५ पासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मागील २० वर्षांत २० हजार कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले. मात्र, एखादे सुसज्ज रुग्णालय उभारता आले नाही. त्यामुळे २० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कल्याणमध्ये आले. यावेळी त्यांनी महापालिकेची आरोग्य यंत्रणा थिटी असल्याची टीका केली. याच पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘२० वर्षांत महापालिकेने कोट्यवधींच्या निविदा काढल्या. जवळपास २० हजार कोटी खर्च केले. गटारे व पायवाटांची कामे करून टक्केवारीचे राजकारण केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी एकही सुज्ज रुग्णालय उभारले नाही. त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यात केडीएमसी प्रशासन अपुरे पडले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खाते होते. येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. दुसरीकडे पालकमंत्री केवळ आढावा बैठका घेत आहेत. खासदार डॉक्टर असून, त्यांनी तरी आरोग्य प्रश्नावर गांभीर्य दाखविण्याची गरज आहे.’
>‘यंत्रणा पडली उघडी’
कोरोनासंदर्भात सगळ्यात आधी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापालिकेकडे एकच व्हेटिंलेटर असल्याचे सांगण्यात आले होते. ही दयनीय अवस्था पहिल्या बैठकीत उघड झाल्याचे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.