ऑनलाइन स्कूल, वर्क फ्रॉम होम सांभाळताना पालकांचे मानसिक संतुलन लागले बिघडायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:47+5:302021-08-24T04:43:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. पालकांना वर्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. पालकांना वर्क फ्रॉम होम करायचे असते, त्यातच मुलांनादेखील सांभाळायचे असते. त्यात त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातदेखील ते आग्रही असतात; पण घरातच शाळा आल्याने घर आणि शाळा यांची सांगड घालताना पालकांची कोंडी होताना दिसते. त्यामुळे अनेक घरांतील पालकांचे मानसिक संतुलन बिघडल्याच्याही केसेस काही प्रमाणात येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.
स्क्रीनिंग फ्री म्हणजे कोणतीही स्क्रीन बघू नये, असे अनेकदा सांगूनही पालक, पाल्य हे नाइलाजाने मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक बघत असतात. तासनतास ते स्क्रीनवर व्यस्त असल्याने शारीरिक हालचाली मंदावल्याने समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मानसिक संतुलन राखणे हे पालक आणि पाल्य तसेच शिक्षकांना आव्हान आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून शांत बसण्याची गरज प्रत्येकाला असून स्वतःला वेळ देण्यासाठी धडपड करायला हवी, असे आवाहन जाणकार वैद्य करत आहेत.
-----------------
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली - शारीरिक हालचाली नाहीत
दुसरी - शारीरिक हालचाली नाहीत
तिसरी - शिक्षक काय शिकवतात ते कळत नाही
चौथी - पालकांना, मुलांना कसं समजावायचं हा प्रश्न
पाचवी- अभ्यासक्रम वाढलेला असल्याने तणाव
सहावी - पालक, शिक्षक आणि पाल्य यांचा समन्वय
सातवी- अभ्यासक्रम वाढलेला असल्याने समजत नसल्याच्या तक्रारी
आठवी- विषय वाढल्याने नव्या विषयाचे काय करायचे ही समस्या
नववी- पाया कच्चा असल्यास मोठी अडचण
दहावी- परीक्षा झाल्या नसल्या तरी तणाव कायम
मुलांच्या समस्या
वेळच्या वेळी ऑनलाइन लेक्चर अटेंड न केल्याने काही कळत नाही
डोळ्यांची समस्या
शारीरिक हालचाल नाही
कंटाळा, चालढकलपणा वाढलाय
एकटेपणाची भावना
-/-/-///-/-////////--
पालकांच्या समस्या
पालकांना वर्क फ्रॉम होम सांभाळून मुलांचे ऑनलाइन शिक्षण ही दुहेरी समस्या
इंटरनेटच्या तांत्रिक समस्या
झोप पूर्ण न होणे
कामाचा ताण, त्यात पाल्यांना समजावायचे कसे?
घर, ऑफिस, मुलांचा अभ्यास करताना कसरत
दुसऱ्याला येते पण आपल्या मुलाला का नाही, अशी मानसिक स्पर्धा
यामुळे मानसिक संतुलन अस्थिर
----/////---------
कोविड काळात पालक, पाल्यांच्या नानाविध मानसिक आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपल्या मुलाला का येत नाही, या चिंतेने पालक बेचैन असतात. त्यात पाल्य मात्र मित्र नाही, खेळ नाही, यामुळे एकलकोंडा झालेला आहे. शाळा तातडीने सुरू व्हायला हव्यात. आठवड्यातून एक दिवस तसेच रोज नो स्क्रीनिंग ठरवून बाहेर फिरायला जाणे. मित्र-मैत्रिणींना भेटणे आणि मन मोकळे करण्याची गरज आहे.
-डॉ. विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ, डोंबिवली