अनधिकृत बांधकामावरील लक्षवेधी का गुंडाळली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:43 AM2021-08-26T04:43:07+5:302021-08-26T04:43:07+5:30
ठाणे : शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. परंतु झालेली ...
ठाणे : शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. परंतु झालेली चर्चा ही कायद्याला धरून नसल्याची बाब समोर आली आहे. लक्षवेधीचे वाचन आधी सचिवांकडून केले जाते, त्यानंतर प्रशासनाकडून खुलासा आणि त्यावर सभागृह निर्णय घेत असते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांकडूनच ही लक्षवेधी गुंडाळली गेल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना काळात अनधिकृत बांधकामे वाढल्याची चर्चा झाली होती. त्याविरोधात काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यादेखील केल्या. त्यानंतर अचानकपणे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा वेग वाढला. त्यामुळे स्थानिक भूमिपूत्रांनी आंदोलन करीत कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. काँग्रेसने यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यामुळे महासभेत यावर चर्चा होऊन काही तरी ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु ठाणेकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत रात्री उशिरा या लक्षवेधीवर चर्चा झाली. परंतु या महासभेत लक्षवेधीवर चर्चा करण्यापूर्वी सचिवांनी आधी लक्षवेधीचे वाचन करणे अपेक्षित होते. परंतु वाचन झालेच नाही. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकाने लक्षवेधीचे वाचन केले. त्यानंतर, सूचकाने त्याचे वाचन केले. यानंतर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. शिवाय सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर महापौरांनी त्यावर निर्णय देणे अपेक्षित होते. परंतु तसेदेखील झाले नाही, त्यामुळे ही चर्चा केवळ दिखाव्यासाठी झाली होती का, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कोणाला वाचविण्यासाठी ही चर्चा गुंडाळण्यात आली का? अशी चर्चाही सध्या रंगू लागली आहे.